रत्नागिरीत सुरु होणार ‘शाळेबाहेरील शाळा’ उपक्रम

रत्नागिरी:- ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवण्यासाठी आणि मुंबई, पुण्यातील नगरांमध्ये मिळणारे अत्याधुनिक शिक्षण सर्वसामान्य विद्यार्थ्यांना देण्याच्या उद्देशाने रत्नागिरीत शाळा बाहेरील शाळा उपक्रम, ई-क्लासरुम यासारखे शैक्षणिक उपक्रम राबविणार्‍या संस्थाशी चर्चा सुरु आहेत. प्रथम संस्थेच्या माध्यमातून मुलांना गावातीलच उच्च शिक्षीत विद्यार्थी, सुशिक्षित ग्रामस्थ आणि पालकांच्या सहकार्याने धडे देण्याच्या हालचाली सुुरु आहेत. शिक्षक दिनी अध्यक्ष रोहन बने, शिक्षण सभापती सुनील मोरे यांनी संबंधितांशी प्राथमिक चर्चा करुन उपक्रमांची मुहूर्तमेढ रोवली.

भौगोलिकदृष्ट्या अडचणीच्या अशा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा श्रीगणेशा जिल्हा परिषद शाळांमधून होतो. शिक्षणातील स्पर्धा वाढत असून जिल्हा परिषद शाळांचाही दर्जा वाढविण्याची गरज आहे. त्यासाठी शिक्षण क्षेत्रातील प्रथम संस्थेसारख्या नावाजलेल्या संस्थांची मदत घेतली जाणार आहे. शिक्षण क्षेत्रातील परिस्थिती ‘असर’ अहवालातून प्रथम संस्थेने मांडली होती. याच संस्थेने नांदेड, गडचिरोली, सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये ‘शाळा बाहेरील शाळा’ उपक्रम राबविण्यास सुरवात केली आहे. अध्यक्ष बने, सभापती मोरे यांच्यासह मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड, शिक्षणाधिकारी निशादेवी वाघमाडे यांना प्रथम संस्थेच्या उपक्रमाची माहिती घेतली. रत्नागिरीतील प्रतिनिधी ॠतुजा पाटील यांनी ऑनलाईन माहिती दिली.

कोरोनाच्या टाळेबंदीत विद्यार्थ्यांना नियमित अभ्यासात गुंतवुन ठेवण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. त्यातूनच गुणवत्तही वाढणार आहे. यामध्ये विद्यार्थ्यांच्या पालकांचे प्रबोधन करण्यात येणार आहे. गावातील सुशिक्षीत ग्रामस्थ, उच्चशिक्षीत विद्यार्थी यांच्यामाध्यमातून मुलांना ऑनलाईन पध्दतीने किंवा प्रत्यक्ष संपर्क साधून स्वाध्याय देणे, गृहपाठातून सराव करुन घेण्यात येते. टाळेबंदीतही मुलांचे शिक्षण सुरु राहणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यात सुमारे दीड हजार गावे असून पावणेतीन हजार जिल्हा परिषद शाळा आहेत. प्रत्येक गावापर्यंत पोचण्यासाठी केंद्रप्रमुख, विस्तार शिक्षण अधिकारी, शिक्षक यांची मदत घेतली जाईल. मुलांना स्वाध्यायातून अभ्यास शिवणे सोपे जाणार आहे. हे करताना ग्रामीण भागातील पालकांमध्ये जनजागृती केली जाईल. नियमित शिक्षणाबरोबरच स्वाध्यायाच्या माध्यमातून अधिकचा अभ्यास करता येणार आहे. प्रथम संस्थेबरोबरच जिल्हापरिषदेकडून ई क्लासरुम संकल्पनाही समजुन घेण्यात येत आहे. शाळांमध्ये ती कशी राबवता येऊ शकते याचा विचार सुरु झाला आहे.

बदलत्या काळाप्रमाणे शिक्षणातील नवीन धोरणे स्विकारणे गरजेचे आहे. ‘शाळेबाहेरील शाळा’ या उपक्रमाची माहिती घेतली असून जिल्हा परिषद पदाधिकारी, सदस्य, अधिकारी यांच्याशी चर्चा करुन पुढे निर्णय घेतला जाणार आहे. अत्याधुनिक अभ्यासक्रम शिकवण्यासाठी व्हॉटस्अ‍ॅप, रेडीओ, शैक्षणिक अ‍ॅपचा उपयोग करणे गरजेचे आहे. – रोहन बने, जि.प. अध्यक्ष