निरुळ केंद्राच्या १२ शाळांतून आषाढी एकादशीनिमित्त समाज प्रबोधन
रत्नागिरी:- स्वामी स्वरूपानंद यांच्या छत्रछायेखाली असलेल्या रत्नागिरी तालुक्यातील पावस प्रभागातील निरुळ केंद्रांतर्गत येणाऱ्या १२ शाळांच्यावतीने शनिवार २५ जुलै रोजी आषाढी एकादशीनिमित्त एक आगळावेगळा उपक्रम राबवण्यात आला. सकाळी ७.३० ते १०.३० या वेळेत काढण्यात आलेल्या वारकरी दिंडीला ‘नवसाक्षरता अभियाना’ची जोड देऊन विद्यार्थ्यांमार्फत प्रभावी समाज प्रबोधन करण्यात आले.
या विशेष वारीमध्ये विद्यार्थ्यांमार्फत साक्षरतेचे महत्त्व, वृक्षारोपणाची नितांत गरज, तसेच भारतीय संस्कृती आणि वारीच्या समृद्ध वारशाचे सुंदर सादरीकरण करण्यात आले. या उपक्रमामुळे केवळ वारकरी संप्रदायाचा संदेश घराघरांपर्यंत पोहोचला नाही, तर आजच्या काळात जिल्हा परिषद शाळांचे महत्त्व आणि त्यांची गरज याविषयीची जनजागृतीही ग्रामीण भागात प्रभावीपणे करण्यात आली.
या प्रेरणादायी कार्यक्रमास गावातील सर्व शाळांचे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, सर्व गावातील सरपंच आणि सन्माननीय ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या संपूर्ण उपक्रमाला जिल्हा परिषद शिक्षण सभापती मा. नंदकुमार मुरकर, विस्तार अधिकारी हिरवे मॅडम आणि निरुळ केंद्रीय प्रमुख श्रीमती अश्विनी पाटील मॅडम यांचे बहुमोल मार्गदर्शन व सहकार्य लाभले. या अभिनव उपक्रमामुळे निरुळ परिसरामध्ये आषाढी एकादशीचा सोहळा एकात्मिक आणि ज्ञानवर्धक वातावरणात पार पडला.









