उद्योगमंत्री उदय सामंत यांची घोषणा
रत्नागिरी:- रत्नागिरी शहरासह जिल्ह्याचा पुढील १०० वर्षांचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्यासाठी समुद्राचे खारे पाणी गोड करण्याच्या प्रकल्पावर ठोस चर्चा झाली आहे. यासाठी एमआयडीसीमार्फत लवकरच संबंधित कंपनीला जागा उपलब्ध करून दिली जाईल असे राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
केवळ ग्रामीण भागातच नव्हे, तर शहरांमध्येही पाणीटंचाईची परिस्थिती गंभीर बनत आहे. भविष्यातील पाण्याचे दुर्भिष्य लक्षात घेऊन समुद्रातील खारे पाणी गोडे करण्याच्या प्रकल्पाबाबत काही उद्योजकांशी चर्चा झाली आहे. चेन्नईमध्ये अशा प्रकारचा प्रकल्प झाला आहे. त्यापध्दतीने येथे प्रकल्प उभारण्याचा प्रयत्न आहे. यामुळे पाणी पट्टीत इकडे तिकडे होऊ शकते. परंतु असा प्रयत्न सुरु आहे.
जिल्ह्यातील तीन तालुके दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर झाले आहेत. उर्वरीत सहा तालुके हे दुष्काळ ग्रस्त यादीत यावेत यासाठी नुकतीच मुंबईत झालेल्या राज्य शासनाच्या उपसमितीच्या बैठकीत मागणी करण्यात आलेली आहे. पुढील आठवड्यात याबाबत निर्णय होईल व त्यात यश येईल असे पालकमंत्री यांनी सांगितले.









