रत्नागिरीत सकाळी 7 ते 11 वेळेत किराणा दुकान उघडण्याबाबत संभ्रम

आदेश मिळाले नसल्याचे प्रशासनाचे म्हणणे 

रत्नागिरी:- किराणा दुकाने सकाळी 7 ते 11 या दरम्यान उघडी राहतील, या वृत्ताने शहरात अनेक ठिकाणी किराणा खरेदीसाठी सकाळी नागरिकांनी दुकानांवर गर्दी केली; मात्र याबाबत प्रशासनाकडे खुलासा विचारता असा कोणतेही आदेश आला नसल्याचे सांगितले. त्यामुळे संभ्रम निर्माण झाला आहे. किराणा दुकाने बंद राहतील फक्त घरपोच सेवा द्यावी. कोणत्याही अफवांवर विश्‍वास ठेवू नये. परस्पर निर्णय घेण्याऐवजी प्रशासनाकडून खात्री करावी, असे मेसेज प्रशासनाने सोशल मीडियावर टाकले आहेत.

जिल्ह्यात संचारबंदीची कडक अंमलबजावणी सुरू आहे. अत्यावश्यक सेवांवरही बंधने आणली आहेत. त्यामुळे किराणा दुकानदार, भाजी, फळेवाले यांना सर्व चाचण्या करून घरपोच सेवा देण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत. कालपर्यंत याची अंमलबजावणी सुरू होती; मात्र सोशल मीडियावर याबाबत अनेक पोस्ट फिरू लागल्या. शासनस्तरावर त्याबाबत काल निर्णय झाल्याचे मदत व पुनर्विकासमंत्री विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले. 30 एप्रिलपर्यंत राज्यात कडक लॉकडाउनचा विचार आहे. त्याचे पहिले पाऊल म्हणजे जीवनावश्यक वस्तूंच्या यादीत असलेल्या किराणा दुकाने आता केवळ सकाळी 7 ते 11 या दरम्यान उघडी ठेवण्याची परवानगी देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

याचे पडसाद तत्काळ शहरात उमटले. शहरातील अनेक किराणा दुकानदारांनी सकाळी लवकर एक शटर उघडून किराणा देण्यास सुरवात केली. ग्राहकांना कोरोनाचे नियम लागू केले. एक-एक करत यादी घेऊन त्यांना जिन्नस देण्यात येत होते. अनेक ठिकाणी अशाप्रकारे आज किराणा दुकाने उघडण्यात आली होती.