रत्नागिरीत लसीकरणात ‘झिरो वेस्टेज’ मिशन

दहा जणांच्या उपस्थितीत व्हायलचा वापर

रत्नागिरी:-कोरोनावरील लसीकरण मोहीमेत डोस वाया जाण्याचे प्रमाण अधिक होते. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांनी ‘झिरो वेस्टेज’ मिशन हाती घेतले आहे. लसीच्या व्हायलमधील जादाची मात्रा लाभार्थ्यांसाठी वापरली जाणार असून केंद्रावर दहा जणं उपस्थित असतील तेव्हाच व्हायला फोडाव्यात अशा सुचना दिल्या आहेत. व्हायलमधील जादा मात्रेमुळे अधिक लोकांना लस देता येईल असे डॉ. जाखड यांनी सांगितले.

दुसर्‍या लाटेत कोरोनाचे रुग्ण वाढले आहेत. भितीचे वातावरण असल्यामुळे लसीकरणाचा पर्याय अवलंबत आहेत. जिल्ह्यातील सर्वच केंद्रांवर गर्दी आहे. ऑनलाईन आरक्षणही काही मिनिटात फुल्ल होतात. मागणी अधिक आणि पुरवठा कमी अशी स्थिती आहे. मोहीमेच्या सुरवातीला व्हायल फोडल्यानंतर लाभार्थी कमी असल्यामुळे डोस वाया जात होते. व्हायल फोडल्यानंतर ते चार तासच वापरु शकतो. डोस वाया जाण्याचे प्रमाण 2 ते 3 टक्के होते. सध्या ते एक टक्क्यापेक्षाही खाली आले आहे. हे प्रमाण शुन्यावर आणण्यासाठी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांच्या सुचनेनुसार झिरो वेस्टेज मिशन आखण्यात आले आहे. केरळमध्ये हे मिशन राबविण्यात आल्याची माहिती मिळाली होती. त्याची अंमलबजावणी महाराष्ट्रात काही ठिकाणी सुरू आहे. रत्नागिरीत हा प्रयोग सुरू झाला आहे. एका व्यक्तीला मात्रा देताना सिरीनमध्ये 0.5 मिली लस भरली जाते. हे करत असताना एखाद दुसरा थेंब वाया जाण्याची शक्यता असते. कोविशिल्ड लसीच्या व्हायल बनवताना दहा टक्के अधिक मात्रा कंपनीमधून ठेवण्यात आल्या आहेत. अनेक वेळा एका व्हायलमध्ये दहा जणांना मात्रा दिली की एक मात्रा शिल्लक राहते. ती वाया जाते. शिल्लक मात्रेचा वापर जादा व्यक्तीसाठी केला तर वाया जाण्याच्या प्रमाणावर नियंत्रण राहील आणि अधिक लोकांना लस देता येईल. हा विचार करुनच लसीकरणा केद्रांना सूचना दिल्या आहेत. यामुळे एका व्हायलमध्ये अकरा जणांना लाभ मिळेल आणि 5 टक्के बचतही होईल.