रत्नागिरीत बंड्या साळवी यांच्यासह शेकडो कार्यकर्ते शिंदे सेनेत

रत्नागिरी:- रत्नागिरीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला खिंडार पडले असून तालुकाप्रमुख प्रदीप उर्फ बंड्या साळवी यांच्या नेतृत्वाखाली शेकडो कार्यकर्त्यांनी पालकमंत्री ना. उदय सामंत यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. यामध्ये उपतालुकाप्रमुख अभय खेडेकर, महेंद्र झापडेकर आदींचा समावेश आहे.

विधानसभा निवडणुकीत महायुतीला घवघवीत यश मिळाल्यानंतर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पक्षसंघटन बळकट करण्याकडे शिवसेनेने लक्ष केंद्रीत केले आहे. राज्यभरात ‘ऑपरेशन टायगर’ला राज्यभरात सुरुवात झाली आहे. या ऑपरेशनची सुरुवात रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातून सुरू झाली आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या गडाला सुरूंग लावत पालकमंत्री ना. उदय सामंत यांनी मोठा धक्का दिला आहे.

यावेळी शिवसेनेच्यावतीने जंगी शक्तीप्रदर्शन करण्यात आले. तालुकाप्रमुख बंड्या साळवी, अभय खेडेकर, महेंद्र झापडेकर, दत्ता तांबे, आप्पा घाणेकर आदींच्या नेतृत्त्वाखाली मोठे शक्तीप्रदर्शन करण्यात आले. ‘शिवसेना जिंदाबाद’च्या घोषणांनी सारं वातावरण दणाणून सोडले होते.

हॉटेल विवेकच्या मैदानावर उद्योगमंत्री ना. उदय सामंत यांच्या उपस्थितीत भव्य पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी आ. किरण सामंत, जिल्हाप्रमुख राहुल पंडीत, शहरप्रमुख बीपिन बंदरकर, ज्येष्ठ नगरसेवक राजन शेट्ये, विजय खेडेकर, वैभवी खेडकर, स्मितल पावसकर, शिल्पा सुर्वे, निमेष नायर यांच्यासह विधानसभा मतदारसंघातील अनेक पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी मालगुंड, करबुडे, गोळप, हरचेरी आदी भागातील उद्धव ठाकरेंच्या शिवसैनिकांनी पालकमंत्री ना. उदय सामंत यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.

तालुक्यात उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मदार तालुकाप्रमुख बंड्या साळवी यांच्या खांद्यावर होती. तालुक्याचा गड साळवी यांच्या ताब्यातच होता. मात्र याच गडाला सुरुंग लावण्यात पालकमंत्री ना. उदय सामंत यांना यश आले. साळवी यांच्या प्रवेशामुळे उद्धव ठाकरे पक्षाचा गडच उद्ध्वस्त झाला आहे.

पालकमंत्री उदय सामंत यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला धक्का दिल्यानंतर त्याचे परिणाम स्थानिक पातळीवर उमटणार आहेत. गोळप, करबुडे, हरचेरी, मालगुंड आदी गावातील उबाटा पक्षाला मोठे खिंडार पडल्याने गावातील राजकीय समीकरणेही बदलण्याची शक्यता आहे. येत्या स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीत गावातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे.

यावेळी आपले विचार व्यक्त करताना बंड्या साळवी म्हणाले की, या पक्षप्रवेशामुळे आमच्यावर टीका व्हायला सुरुवात होईल. आम्ही पक्षाला फसवून प्रवेश केलेला नाही तर कार्यकर्त्यांना विश्‍वासात घेऊन हा प्रवेश करत आहोत. गेली अडीच वर्ष गळ्यातील धनुष्यबाणाचा दुपट्टा बाजूला गेला होता. ३० वर्ष आम्ही हा धनुष्यबाण गळ्यात घालून काम करत होतो. आम्ही मनाने उदय सामंत यांच्या सोबतच होतो, असे त्यांनी यावेळी सांगितले.

बंड्या साळवी पुढे म्हणाले की, यावेळी विधानसभा निवडणुकीत आम्ही तिकडे होतो. महाआघाडीच्या उमेदवाराला ७० हजार मते मिळाली. यापुढे ७० हजाराचे मतदान आम्ही १७ हजारावर आणून ठेवू. येणार्‍या प्रत्येक निवडणुकीत शिवसेनेचे १०० टक्के उमेदवार निवडून आणणार, अशी घोषणाच त्यांनी यावेळी केली.

या विधानसभा मतदारसंघात खर्‍या अर्थाने विकासाची गंगा उदय सामंत यांनी आणली. गेली अडीच वर्ष आम्ही बाजूला होतो. त्यामुळे काही भाग विकासापासून वंचित राहिला. जर आम्ही त्याचवेळी त्यांच्यासोबत गेलो असतो तर आजचे चित्र फार वेगळे असते.

या कार्यक्रमात जिल्हाप्रमुख राहुल पंडीत यांनी आतापर्यंत मी जिल्हाप्रमुख आहे, पुढे काय असेल माहित नाही, असे वक्तव्य केले होते. या वक्तव्याचा धागा पकडत आ. किरण सामंत यांनी जिल्हाप्रमुख पद हे बदलणार नसल्याची खात्री देत सांगितले की, तुम्ही भाग्यशाली जिल्हाप्रमुख आहात. तुमचं जिल्हाप्रमुखपद कोणीही काढणार नाही, हा शब्द मी तुम्हाला देतो, असे भर भाषणात आ. किरण सामंत यांनी जाहीर केले आणि टाळ्यांचा कडकडाट झाला.