Friday, May 29, 2026
spot_img
Home रत्नागिरी रत्नागिरीत निवेंडी, धामणसेत लवकरच एमआयडीसी

रत्नागिरीत निवेंडी, धामणसेत लवकरच एमआयडीसी

रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला गती देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने एक मोठे पाऊल उचलले आहे. रत्नागिरी तालुक्यातील निवेंडी आणि धामणसे या दोन गावांमधील जमिनी ‘महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ’ साठी संपादित करण्याची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम, १९६१ च्या कलम ३२ (२) अन्वये उपविभागीय अधिकारी (रत्नागिरी) यांनी ही अधिसूचना प्रसिद्ध केली आहे.

या अधिसूचनेनुसार, निवेडी गावातील सुमारे १.९२ हेक्टर आणि धामणसे गावातील २.७९ हेक्टर जमीन औद्योगिक क्षेत्रासाठी निश्चित करण्यात आली आहे. यामध्ये निवेडीतील सर्वे नंबर ३६, ३७, ४३, ४५, ४५ आणि धामणसेमधील सर्वे नंबर १०५, १६९ मधील ठराविक हिश्श्यांचा समावेश आहे. या जमिनींचा वापर भविष्यात उद्योगधंदे उभारण्यासाठी किंवा औद्योगिक वसाहतीच्या सोयीसुविधा विकसित करण्यासाठी केला जाणार आहे.

शासनाने स्पष्ट केले आहे की, ही नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून संबंधित जमिनींच्या विक्रीवर, हस्तांतरणावर किंवा कोणत्याही प्रकारच्या नवीन बांधकामावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. जर या काळात कोणीही जमिनीचा व्यवहार केला किंवा त्यावर सुधारणा करण्याचा प्रयत्न केला, तर त्यासाठी कोणतीही भरपाई दिली जाणार नाही. तसेच, भूसंपादन कायद्यानुसार (२०१३) या जमिनींचा ताबा घेताना योग्य नुकसान भरपाई देण्याची तरतूदही करण्यात आली आहे.

ज्या जमीन मालकांना किंवा या जमिनीशी संबंधित इतर व्यक्तींना या निर्णयावर काहीही आक्षेप घ्यायचा असेल, त्यांना १५ दिवसांची मुदत देण्यात आली आहे. त्यांनी आपले लेखी म्हणणे पुराव्यांसह रत्नागिरी येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयात सादर करणे आवश्यक आहे. ज्यांना प्रत्यक्ष सुनावणी हवी आहे, त्यांना सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत आपले म्हणणे मांडता येईल.

या संपादनामुळे परिसरातील औद्योगिक विकासाला चालना मिळणार असली, तरी स्थानिक जमीन मालकांना आपल्या हरकती नोंदवण्यासाठी ही अंतिम संधी असल्याचे प्रशासनाने नमूद केले आहे. या प्रक्रियेनंतर जमिनींचा ताबा घेण्याची अंतिम कार्यवाही पूर्ण केली जाईल.