रत्नागिरीत एसटी कर्मचारी संपावर ठाम; केवळ 203 कर्मचारी कामावर हजर

रत्नागिरी:- परिवहन मंत्र्यांनी पगारवाढीची घोषणा करूनही एसटी कर्मचारी काम बंद आंदोलनावर ठाम आहेत. परंतु गुरुवारी जिल्ह्यात २०३ कर्मचारी कामावर हजर होते. त्यामुळे कार्यालय आणि चार आगारांतून फेऱ्या सुरू झाल्या आणि प्रवाशांना अल्प दिलासा मिळाला. जिल्ह्यात ९ फेऱ्या सोडण्यात आल्या. परिवहन मंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे निलंबित कर्मचारीही हजर होऊ लागल्याने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई टळण्याची शक्यता आहे.

जिल्ह्यात गुरुवारी देवरूख, राजापूर आणि चिपळूण आगारातून काही फेऱ्या सोडण्यात आल्या. बुधवारी १५० कर्मचारी कामावर हजर झाले होते. गुरुवारी त्यात सुमारे पन्नास कर्मचाऱ्यांची भर पडली. परिवहन मंत्र्यांनी कामावर हजर झालेल्या कर्मचाऱ्यांचे निलंबन रद्द करण्याची घोषणा केली होती. त्यामुळे निलंबित केलेले काही कर्मचारी आज हजर झाल्याचे समजते. अनेक कर्मचारी शुक्रवारी हजर होण्याची शक्यता आहे. 

रत्नागिरी एसटी विभागातील १०८ कर्मचाऱ्यांचे निलंबन केले असून ३१ जणांची सेवा समाप्त केली. सलग १८ व्या दिवशी आंदोलन सुरू आहे. परिवहन मंत्र्यांनी वेतनवाढीची घोषणा करूनही कर्मचारी विलिनीकरणावर ठाम आहेत. दरम्यान, आमदार गोपिचंद पडळकर, माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी आझाद मैदानावर सुरू असलेल्या आंदोलनातून माघार घेतली. मुंबईतून वकील गुणरत्न सदावर्ते आणि संघटनांच्या नेत्यांकडून येणाऱ्या आदेशानंतरच येथील कर्मचारी पुढील निर्णय घेणार आहेत.रत्नागिरीतील एसटी कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन चालू ठेवण्याचा निर्धार केला आहे.

याबाबत कर्मचाऱ्यांनी सांगितले की, शासनात विलिनीकरणाच्या मागणीवर आम्ही ठाम आहोत. काल मंत्र्यांनी केलेल्या घोषणा फक्त राजकीय आहेत.प्रशासकीय १२९, कार्यशाळा ६३, चालक ८, वाहक ३ असे एकूण २०३ कर्मचारी कामावर हजर झाले. सध्या प्रत्यक्ष संपामध्ये प्रशासकीय ३७२, कार्यशाळा ५६८, चालक २ हजार ३६२, वाहक ७६६ असे एकूण ४०६८ कर्मचारी सहभागी झाले आहेत. आज शुक्रवारी मोठ्या संख्येने कर्मचारी कामावर हजर होतील, असा विश्वास एसटीच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.