रत्नागिरी:- जिल्ह्यात कोरोनामुळे गंभीर झालेल्या रुग्णांची संख्या वाढत असून उपचारासाठी अतिदक्षता कक्षातील बेडची संख्या अपुरी पडू लागली आहे. त्यामुळे अनेकांना परजिल्ह्यातील रुग्णालयांची वाट धरावी लागत आहे. याकडे प्रशासनाने गांभिर्याने पहावे अशी मागणी सुरु झाली आहे.
जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत साडेसोळा हजाराहून अधिक कोरोना बाधित झाले असून साडेबारा हजार लोक बरे झाले. सध्या 2 हजार रुग्ण उपचार घेत आहेत. यातील ऑक्सीजन आणि व्हेंटीलेटरवर असलेल्यांचा आकडा दर दिवशी वाढत आहे. उशिराने रुग्ण उपचारासाठी येत असल्यामुळे मृत्यूची संख्या पावणेपाचशे पर्यंत पोचली आहे. रत्नागिरीत महिला रुग्णालय आणि जिल्हा शासकीय रुग्णालय ही कोविड रुग्णालये आहेत. तेथे अतिदक्षता विभागात प्रत्येकी 18 बेडस्ची सुविधा आहे. बुधवारपर्यंत मिळालेल्या माहितीनुसार सर्वच्या सर्व बेडस् फुल्ल झाले आहेत. रत्नागिरीतील एका खासगी रुग्णालयातही बेडस् नाहीत. लांजा तालुक्यातील खासगी रुग्णालयात तिन, खेड-कळबंणीतील दहा बेडस् तर चिपळूण तालुक्यातील विविध रुग्णालयात असलेले 55 बेडस् फुल्ल आहेत. दापोली, लांजा, मंडणगड, राजापूर, संगमेश्वर या तालुक्यात अतिदक्षता कक्षच नसल्याने सर्व भर रत्नागिरी शहरातील रुग्णालयांवर येतो. व्हेंटीलेटर्स्ची संख्याच अपुरी असल्याने कोरोनातील या भिषण परिस्थितीत अतिगंभीर रुग्णांवर उपचार करणे अशक्य झाले आहे. बेडस् उपलब्ध नसल्याने रुग्णाला अन्यत्र घेऊन जाण्यासंदर्भात काही रुग्णांच्या नातेवाईकांकडून लिहून घेण्याची वेळ आरोग्य यंत्रणेवर आली आहे. यंत्रणा सक्षम नसल्याने जिल्ह्यातील मृत्यू दरही वाढत आहे. दिवसाला सरासरी पाच ते सात रुग्णांचा मृत्यू होत आहे. राज्यभरात सगळीकडेच परिस्थिती गंभीर झालेली आहे. रत्नागिरीतील काही रुग्ण कोल्हापूर, मुंबईकडे उपचारासाठी जात आहेत. बहूतांश रुग्णांना ऑक्सीजनवर ठेवले जात रुग्णसंख्या वाढत राहीली तर ते बेडस्ही फुल्ल होण्याची शक्यता आहे. अतिदक्षता विभागावर लक्ष केंद्रीत करणे आरोग्य यंत्रणेपुढील आव्हान बनले आहे.









