रत्नागिरीत आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज ग्रंथालय उभारणार: पालकमंत्री

रत्नागिरी:- आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित असे सुसज्ज ग्रंथालय लवकरच येथे उपलब्ध होईल. या आधुनिक वाचनालयाचा येथील तरुण-तरुणींना नक्कीच फायदा होईल, असे प्रतिपादन रत्नागिरीचे पालकमंत्री ॲड. अनिल परब यांनी केले.


  लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या स्मृती शताब्दी उपक्रमांतर्गत शासकीय विभागीय ग्रंथालय, रत्नागिरी या कार्यालयाच्या इमारतीच्या अंतर्गत दुरुस्ती, नूतनीकरण, सुशोभीकरण व आधुनिकरण या कामांचा भूमिपूजन सोहळा आज उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी ऑनलाईनद्वारे पालकमंत्री ॲड.अनिल परबदेखील उपस्थित होते. त्यावेळी ते बोलत होते.

   शासकीय विभागीय ग्रंथालयाच्या नूतनीकरणासाठी मंत्री उदय सामंत यांनी तात्काळ निधी उपलब्ध करून विद्यार्थ्यांसाठी चांगली सुविधा उपलब्ध करून देण्यात मोलाची भूमिका पार पाडल्याचे पालकमंत्री अँड. अनिल परब म्हणाले.

यावेळी ज्येष्ठ साहित्यिक राजाभाऊ लिमये, डॉ प्रकाश देशपांडे, अधीक्षक अभियंता छाया नाईक, ग्रंथपाल डॉ. विजयकुमार जगताप, माजी नगराध्यक्ष बंड्या साळवी, बाबू म्हाप आदी उपस्थित होते.

    श्री.सामंत म्हणाले, रत्नागिरी जिल्ह्याला अनेक थोर विचारवंतांचा वारसा आहे, या कर्तृत्ववान व्यक्तींचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून येथीलच विद्यार्थी आयएएस, आयपीएस बनले पाहिजे. रत्नागिरी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देताना येथे सुसज्ज असे आधुनिक वाचनालय उभे राहणार आहे. त्यामुळे भविष्यात रत्नागिरीतुनच आयएएस, आयपीएस अधिकारी तयार होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

      लोकमान्य टिळक शासकीय ग्रंथालयाच्या आधुनिकरणाला ४ कोटी २५ लाख देण्यात आले आहे, त्यामधून सुसज्ज आधुनिक असे वाचनालय उभे राहून याचा निश्चितच लाभ विद्यार्थ्यांना होईल, मराठी भाषा दिनी आज हा कार्यक्रम संपन्न होत आहे याचा आपल्याला विशेष आनंद होत असल्याचेही ते म्हणाले .

     ग्रंथपाल विजयकुमार जगताप यांनी आपल्या प्रास्तावनेत ग्रंथालय ची माहिती दिली, ग्रंथालयाचे आधुनिककरण होणे आवश्यक होते त्यासाठी उदय सामंत यांनी पुढाकार घेतल्याचे ही त्यांनी सांगितले.