जिल्ह्यात ४३६ सार्वजनिक दुर्गाउत्सव मंडळांची सज्जता; घरगुती घटस्थापनेसह १९ हजारांहून अधिक ठिकाणी होणार प्रतिमा पूजन
रत्नागिरी:- कॊकणवासीयांची आतुरता संपली असून, आज रविवार 11 ऑक्टोबर रोजी आदिशक्तीच्या घटस्थापनेने संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात नवरात्रोत्सवाचा अभूतपूर्व उत्साह पाहायला मिळणार आहे. पुढील नऊ दिवस जिल्ह्यात दांडिया आणि गरब्याची धुमश्चक्री रंगणार असून, भक्ती, शक्ती आणि उत्साहाचा मेळ या उत्सवाच्या निमित्ताने अनुभवायला मिळणार आहे.
यंदा जिल्ह्यात ४३६ सार्वजनिक तर ६५ खाजगी अशा एकूण ५०१ ठिकाणी दुर्गेच्या भव्य मूर्तींची प्रतिष्ठापना केली जात आहे. याचसोबत ४२४ सार्वजनिक आणि तब्बल १९,३१५ खाजगी ठिकाणी घरगुती घटस्थापना करून प्रतिमा पूजन केले जाणार आहे. ग्रामीण भागातील ग्रामदेवतांच्या मंदिरांपासून ते शहर-वाडीवस्त्यांपर्यंत आदिशक्तीच्या स्वागतासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे.
मागील काही वर्षांपासून जिल्ह्यातील प्रमुख शहरांसह ग्रामीण भागातही दांडियाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. रत्नागिरी शहरात गल्लोगल्ली आणि विविध मंडळांच्या माध्यमातून आकर्षक गरबा व दांडिया स्पर्धांचे आयोजन केले जात आहे. तरुणाईचा हा उदंड प्रतिसाद आणि उत्सवाचे स्वरूप लक्षात घेऊन राजकीय मंडळींनीही या उत्सवात हिरिरीने सहभागी होत उत्सव मंडळांना सहकार्याचा हात पुढे केला आहे.
बाजारपेठा सजल्या; 20 ऑक्टोबरला साजरा होणार विजयादशमी दसरा
उत्सवाच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरीसह जिल्ह्यातील सर्वच प्रमुख बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी भाविकांची मोठी गर्दी दिसून येत आहे. दुर्गेची आरास करण्यासाठी लागणारे साहित्य, नऊ रंगांच्या साड्या, दांडिया आणि गरब्यासाठीचे पारंपरिक पोषाख विक्रीसाठी उपलब्ध झाले आहेत.
यंदा घटस्थापनेपासून 10 व्या दिवशी म्हणजेच 20 ऑक्टोबर रोजी विजयादशमी (दसरा) साजरी केली जाणार असून, त्याच दिवशी या नऊ दिवसांच्या भक्तिमय उत्सवाची सांगता होईल. या काळात जिल्ह्यातील मंदिरांवर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली असून, सर्वत्र आनंदाचे आणि भक्तीचे वातावरण पसरले आहे.









