रत्नागिरीत 53 ग्रामपंचायतींसाठी तब्बल 1 हजार 66 उमेदवारी अर्ज

रत्नागिरी:- रत्नागिरी तालुक्यातील 53 ग्रामपंचायत निवडणुकांसाठी 1 हजार 066 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. सोमवारपर्यंत (ता. 4) उमेदवार माघारीची अंतिम मुदत असल्याने किती प्रभाग, कोणत्या ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या हे समजणार आहे. सध्या शंभरहून अधिक जागांवर एकच अर्ज असल्याचे चित्र आहे. तालुक्यात बहूतांश ठिकाणी शिवसेना विरुध्द भाजप अशीच लढत होणार असली तरी काही ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवार उभे केले आहेत.

रत्नागिरी तालुक्यातील 90 ग्रामपंचायतींपैकी 53 ठिकाणी सार्वत्रिक निवडणुक होत आहेत. 30 डिसेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत होती. त्यानंतर छाननी झाली असून माघारीपर्यंत बिनविरोध झालेले उमेदवार जाहीर केले जात नाहीत; मात्र सध्याच्या परिस्थितीत विरोधी उमेदवारी अर्जच आलेल्या जागांवर शिवसेनेकडून दावा केला जात आहे. सध्या मिळालेल्या माहितीनुसार पालीतील 10 जागा, खानुतील 6 जागा, कापडगाव 7, कशेळी 3, हातखंबा 1, उक्षी 7, खालगाव 8, चवे 7, पानवल 7, नाचणे 5, हरचेरी 9, कुरतडे 7, चिंद्रावली 7, झरेवाडी 5, गावखडी 3, नाखरे 2, भाट्ये 3, खरवते 6 आणि जांभरूण ग्रामपंचायतीमधील 7 जागांवर एकच उमेदवारी अर्ज दाखल झाला आहे. तसेच चार ग्रामपंचायती बिनविरोध होण्याची शक्यता आहे.

रत्नागिरी तालुक्यात शिवसेनेने जिल्हा परिषद, पंचायत समितीमध्ये भाजपला संधीच ठेवलेली नाही. पंचायत समितीत भाजपचे दोनच सदस्य आहेत. शिवसेनेकडून ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपला शह देण्यासाठी तयारी सुरु झाली आहे. बहूतांश ठिकाणी निवडणुक बिनविरोध करण्यावरच सेनेचा प्रयत्न सुरु होता; परंतु भाजपने बहूतांश ठिकाणी उमेदवार देत सेनेपुढे आव्हान निर्माण केले आहे. भाजपमधील अंतर्गत कुरघोडीच्या राजकारणाचा परिणाम या निवडणुक निकालांवर दिसेल अशी शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडूनही काही जांगावर उमेदवार उभे केले आहेत. पण तालुक्यात शिवसेना विरुध्द भाजप अशीच लढत होणार आहे.