५ कोटी ७५ लाखांतून दुरुस्तीचे काम सुरु
रत्नागिरी:- स्वातंत्र्यपूर्व तसेच स्वातंत्र्योत्तर काळाचे साक्षीदार असलेल्या रत्नागिरीतील विशेष कारागृहाच्या मजबुतीकरण व दुरुस्तीचे काम सुरु आहे. सुमारे ५ कोटी ७५ लाख रुपये खर्च करुन कारागृहाचे मजबुतीकरण केले जात आहे. त्यामुळे कारागृहाला आता नवा साज चढणार आहे.
कारागृहातील बंदीवान असलेल्या पुरूष आणि महिला कारागृह अंडा सेल, स्वयंपाकगृह , गोदाम, मनोरंजन विभाग, दवाखाना यांच्या दुरुस्तीसह जुने दरवाजे व खिडक्या काढून त्याठिकाणी नवीन बसविणे अशीही कामे केली जाणार आहेत. या कारागृहाचे जुने छत काढून आता नव्याने प्रिकोटेड शीट बसविल्या जाणार आहेत. तर फोम सिलींग, आतील व बाहेरील रंगकाम, जलप्रतिबंधक उपाययोजना केल्या जाणार आहेत.
त्याबरोबर स्वातंत्र्यवीर सावरकर कोठडीतील छायािचत्र दालनाचे नुतनीकरण केले जाणार आहे. तसा कोठडीही डागडुजी, सिंलीग केले जाणार आहे. कारागृह कार्यालयातील कारागृह अधीक्षक कार्यालयाचे नुतनीकरण, विविध शाखेंचे नुतनीकरण आदी कामे नव्याने केली जाणार आहेत.
या विशेष कारागृहाच्या दर्शनी भागाकडील मुख्य इमारताचे छत तसेच समोरील भिंतीला स्टोन क्लॅडिंगचे काम सद्या स्थितीत प्रगतीत आहे. त्याबरोबर आतील व बाहेरील जुने प्लास्टर काढून नवीन प्लास्टर करणे काम प्रगतीत आहेत. गेल्या अनेक वर्षानंतर कारागृहाच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. नव्या कामामुळे कारागृहाला नवा साज चढणार आहे.