रत्नागिरी:- आंतरराष्ट्रीय कांदळवन परिसंस्था संवर्धन दिनानिमित्त मुंबई येथील यशवंतराव चव्हाण केंद्र येथे पार पडलेल्या ‘कांदळवन प्रतिष्ठान पुरस्कार वितरण सोहळा-२०२६’ मध्ये रत्नागिरीचा डंका वाजला आहे. कोकणातील कांदळवन संवर्धन आणि निसर्ग पर्यटनाच्या माध्यमातून शाश्वत रोजगार निर्माण करणाऱ्या रत्नागिरी तालुक्यातील नाचणे-नारायणमळी येथील ‘नवलाई निसर्ग पर्यटन गटाला’ राज्यस्तरीय द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री ना. गणेश नाईक यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. प्रशस्तीपत्र, स्मृतीचिन्ह आणि ७५ हजार रुपये रोख रक्कम असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. या दिमाखदार सोहळ्यास वन विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल) एम. श्रीनिवास राव, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) श्रीनिवास रेड्डी, कांदळवन प्रतिष्ठानचे कार्यकारी संचालक तथा मुख्य वनसंरक्षक एन. आर. प्रवीण यांसह वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी व मान्यवर उपस्थित होते.
महाराष्ट्र शासनाच्या कांदळवन कक्ष आणि कांदळवन प्रतिष्ठान मार्फत २०१७ पासून राबवण्यात येणाऱ्या ‘कांदळवन संवर्धन व उपजीविका निर्माण’ योजनेअंतर्गत नाचणे गावात नारायणमळी येथे ‘कांदळवन सह-व्यवस्थापन समिती’ स्थापन करण्यात आली. याअंतर्गत महिला व पुरुषांचा एकत्र समूह करून ‘नवलाई कांदळवन निसर्ग पर्यटन गटाची’ निर्मिती करण्यात आली.
गटातील सदस्यांना कांदळवन ओळख, पक्षी निरीक्षण, जीवरक्षक प्रशिक्षण आणि सुरक्षाविषयक सखोल कार्यशाळा दिल्यानंतर मार्च 2024मध्ये हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू झाला. अवघ्या एका वर्षात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून ३५०० पेक्षा जास्त पर्यटकांनी या पर्यटन स्थळाला भेट दिली असून, नवलाई गटाला १० लाखांपेक्षा जास्त उत्पन्न मिळाले आहे.
हा पुरस्कार या गटाचे अध्यक्ष दीपक गझने, कांदळवन समिती अध्यक्ष आणि नाचणे सरपंच भैय्या भोंगले, सचिव किरण पाचारणे, उपजिविका तज्ज्ञ वैभव बोंबले, प्रकल्प संमन्वयक स्वस्तिक गावडे यांच्यासह गटाचे सदस्य उपस्थित होते. या पुरस्कारानंतर बोलताना “कांदळवन हे केवळ जंगल नसून निसर्गाने दिलेली एक अमूल्य देणगी आहे. निसर्ग पर्यटन आणि पर्यावरण संवर्धन यांचा ताळमेळ साधत पर्यटकांमध्ये कांदळवनाचे महत्त्व पटवून देणे आणि स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे,” अशी भावना पुरस्कार स्वीकारल्यानंतर नवलाई गटाच्या सदस्यांनी व्यक्त केली.









