रत्नागिरी – सिंधुदुर्ग मतदारसंघात उमेदवारीचं घोडं अडलं चिन्हावर

सेनेने धुडकावलं ; दिवसभर बैठका, आश्वासने

रत्नागिरी:- रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेच्या जागेचा तिढा महायुतीला अद्याप सुटलेला नाही. ठाणे आणि नाशिकच्या जागेवर रत्नागिरीच्या जागेचे भवितव्य अडकले आहे. त्यासाठी गेली कित्येत दिवस महायुतीमध्ये बैठका सुरू आहेत. शिवसेनेचे इच्छुक आणि आशावादी उमेदवार किरण सामंत मुंबईत ठाण मांडून आहेत. भाजपच्या नेत्यांशी बैठका झडत आहेत. परंतु त्यामध्येही कमळ निशाणीचा मुद्दा उमेदवारी जाहीर करण्यास अडसर ठरत असल्याचे समजते. जो उमेदवार असेल तो कमळावरच लढेल, असा आग्रह भाजपचा असल्याने तिढा वाढला आहे.

भाजप आणि शिवसेनेने ही जागा अतिप्रतिष्ठेची केली आहे. अंतर्गत चढाओढीमुळे उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली तरी महायुतीचा उमेदवार जाहीर झालेला नाही. दोन्ही पक्षाची चढाओढ या जागेला घातक ठरण्याची शक्यता आहे. मोजकेच दिवस आता महायुतीच्या हातात आहेत. यंत्रणा राबत असली तरी उमेदवाराचा चेहारा आणि चिन्ह मतदारांपर्यंत जाणे अपेक्षित आहे, ते गेलेले दिसत नाही. विषय जास्तच ताणल्यामुळे शिवसेनेचे किरण सामंत यांनी सूचक स्टेट्स ठेऊन महायुतीला इशाराच दिला होता. त्यामुळे त्यांना मुंबईचा सांगावा आला. गेली तीन दिवस ते प्रमुख पदाधिकाऱ्यांबरोबर मुंबईत आहेत.

परंतु ठाणे आणि नाशिकच्या जागेचा अडसर या जागेला येताना दिसत आहे. भाजप या त्या दोन्ही जागा सोडल्या तर रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेच्या जागेसाठी आग्रही आहे. त्यामुळे कोणती जागा सोडायची असा यक्षप्रश्न शिवसेनेपुढे आहे. त्यासाठी भाजपच्या पदाधिकाऱ्यांशी शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या वारंवार बैठका सुरू आहेत. परंतु त्यात तोडगा काही निघताना दिसत नाही. भाजप ही लोकसभेची जागा शिवसेनेला द्यायला तयार आहे, परंतु ही निवडणूक कमळ चिन्हावर लढण्याचा आग्रह आहे. हे शिवसेनेला मान्य नाही. अशा काही मुद्यांमध्ये तडजोड होत नसल्याने या जागेचा विषय अजून ताणला गेला आहे.


बैठका, आश्वासनाशिवाय काहीच नाही

शिवसेनेचे इच्छुक उमेदवार किरण सामंत यांच्यासह त्यांचे निकटवर्तीय तीन दिवस मुंबईत ठाण मांडून बसले आहेत. परंतु बैठका आणि आश्वासनापलीकडे काहीच पदरात पडत नसल्यामुळे सर्वांचीच मानसिकता ढासळत चालल्याची चर्चा आहे. यातून महत्त्वाचा निर्णय लवकरच होण्याची शक्यता आहे.