परवाने व रहिवासी पुरावे सादर करण्याचे आदेश
रत्नागिरी:- रत्नागिरी शहरातील रस्त्यांवर ठिय्या मांडून बसणाऱ्या फेरीवाले, टपरीधारक व भाजीविक्रेत्यांना रत्नागिरी नगरपरिषदेने नोटीस बजावली आहे. या सर्व व्यावसायिकांना आपले विहीत परवाने तसेच रहिवासी पुराव्याची कागदपत्रे १५ दिवसांच्या आत सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सादर झालेल्या कागदपत्रांची छाननी करून त्यानंतर पुढील कारवाई करण्यात येणार आहे.
शहरातील रस्त्यांवरील परप्रांतीय फेरीवाल्यांविरोधात कारवाई करण्याची मागणी मनसेसह विविध संघटनांनी नगरपरिषदेकडे केली होती. या मागणीच्या पार्श्वभूमीवर नगरपरिषद प्रशासनाने कारवाईचा प्रारंभ केला आहे. अतिक्रमण हटाव पथकाचे अधिकारी विजय कदम यांनी सांगितले की, पहिल्या टप्प्यात शहरातील सर्व हातगाडीधारक, फेरीवाले, टपरीधारक व भाजीविक्रेत्यांना नोटीस बजावण्यात आली आहे.
रत्नागिरीतील ८० फुटी मुख्य रस्त्यासह इतर रस्त्यांवर वाहनधारकांना सतत वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. रस्त्याच्या दोन्ही कडेला उभ्या गाड्या, तसेच व्यावसायिकांच्या टपऱ्या व गाड्यांमुळे मार्ग अरुंद होतो. अंतर्गत रस्त्यांचीही परिस्थिती फारच बिकट आहे. त्यामुळे अनधिकृत व परप्रांतीय फेरीवाल्यांविरोधात कारवाई करावी, अशी मागणी होत होती.
यावर उपाय म्हणून नगरपरिषदेच्या मालमत्ता विभागाने सर्व व्यावसायिकांकडून आधारकार्ड, पॅनकार्ड, परवाने व अन्य कागदपत्रे मागवली आहेत. कागदपत्रांची छाननी झाल्यानंतर योग्य ती कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.









