रत्नागिरी:- मुंबई-गोवा या राष्ट्रीय महामार्गाला छत्रपती शिवाजी महाराज महामार्ग, असे नामंकरन व्हावे, या मागणीचे बॅनर शहरात मुख्य रस्त्याच्या बाजूने लागले होते. हे बॅनर नव्यानेच कोकणात स्थापन झालेल्या कोकण प्रादेशिक पक्षाचे आहेत. बॅनर रत्नागिरीत मारुती मंदिर ते कारागृह दरम्यान होते. अचानक हे बॅनर गायब झाल्याने याची नाक्या-नाक्यावर चर्चा सुरू होती. कोणतीही परवानगी न घेता हे बॅनर लावल्याने ४२ बॅनरवर पालिकेच्या मालमत्ता विभागाने कारवाई करत हटवल्याचे सांगण्यात आले.
रत्नागिरी शहर परिसरात ‘बॅनर चर्चा’ सोशल मिडीयावर गाजत आहे. गेल्या काही दिवसांपासून रस्त्यांच्या दोन्ही बाजूला लावलेले हे बॅनर नागरिकांचे लक्ष वेधून घेत होते. पण सकाळी लोकांनी पाहिले तर एकही बॅनर दिसला नाही. त्यामुळे शहरात बॅनर चर्चा सुरु झाली. आता हे बॅनर नेमके कोणी गायब केले? यावर चर्चा सुरु झाली आहे. काहीजण अशी चर्चा करीत आहेत की, बांधकाम खात्याने किंवा पालिकेने हे बॅनर काढले असतील. तसेच राजकीय पक्ष देखील अशा कामांसाठी कामगार पाठवून हे उद्योग करणार नाही, असेही म्हटले जाते. मग बॅनर काढले कोणी? असा प्रश्न उपस्थित होत आहे. याबाबत पालिकेच्या अतिक्रमन हटाव विभागाशी संपर्क साधला असता पालिकेनेच ही कारवाई केल्याचे स्पष्ट केले. शहरात लावण्यात आलेल्या या बॅनर संदर्भात पालिकेची कोणतीही परवानगी घेण्यात आली नव्हती. त्यामुळे हे सर्व बॅनेर बेकायदेशीर होते. म्हणून आम्ही शहरातील ४२ बॅनर हटविण्याची कारवाई केली आहे. त्यामुळे बॅनरबाबत सुरू असलेल्या चर्चेला पुर्णविरम मिळाला आहे.









