१० दिवसांनंतरही पिंजऱ्यात न अडकल्याने वनविभागाचा अंदाज
रत्नागिरी:- शहरातील अभ्युदयनगर आणि नरहर वसाहत परिसरात दहा दिवसांपूर्वी मध्यरात्रीच्या सुमारास दहशत माजवणारा बिबट्या आता पुन्हा आपल्या मूळ अधिवासात म्हणजेच जंगलात परतला असावा, असा प्राथमिक अंदाज वनविभागाने वर्तवला आहे. गेले दहा दिवस वनविभागाने लावलेले पिंजरे आणि ट्रॅप कॅमेऱ्यांमध्ये बिबट्याची कोणतीही हालचाल कैद झालेली नाही.
काही दिवसांपूर्वी नरहर वसाहतीमधील एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात बिबट्या रस्ता ओलांडताना स्पष्टपणे दिसला होता. मानवी वस्तीत बिबट्याचा वावर दिसताच शहरात भीतीचे वातावरण पसरले होते. या घटनेची गांभीर्याने दखल घेत जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी तातडीने वनविभागाची बैठक घेऊन उपाययोजना करण्याचे निर्देश दिले होते.
बिबट्याचा माग काढण्यासाठी वनविभागाने तातडीने परिसरात चार वेगवेगळ्या मोक्याच्या ठिकाणी पिंजरे लावण्यात आले. बिबट्याला आकर्षित करण्यासाठी पिंजऱ्यात शेळी ठेवण्यात आली होती. वनविभागाच्या पथकांनी शहरातील आजूबाजूच्या जंगल परिसरात रात्रंदिवस गस्त घातली शिवाय बिबट्याच्या मार्गावर अत्याधुनिक ट्रॅप कॅमेरे बसवण्यात आले होते. दहा दिवस उलटूनही बिबट्या पिंजऱ्याकडे फिरकला नाही, तसेच लावलेल्या ट्रॅप कॅमेऱ्यातही त्याचे दर्शन झाले नाही. यावरून वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी तर्क लावला आहे की, हा बिबट्या केवळ खाद्याच्या शोधात चुकून शहरात आला असावा. अभ्युदयनगर परिसर जंगलाला लागून असल्याने आणि तेथे लोकवस्ती दाटीवाटीची नसल्याने, तो सहजपणे पुन्हा जंगलभागात निघून गेला असावा.
विशेष म्हणजे, बिबट्याला पकडण्यासाठी पिंजऱ्यात ठेवलेली शेळी अद्याप सुरक्षित आहे. बिबट्याने तिच्यावर किंवा परिसरातील अन्य कोणत्याही पाळीव प्राण्यावर हल्ला केल्याची नोंद नाही, ज्यामुळे तो परिसरातून निघून गेल्याच्या दाव्याला पुष्टी मिळत आहे.
तरीही, नागरिकांनी खबरदारी घ्यावी आणि संशयास्पद हालचाल दिसल्यास वनविभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.









