Saturday, August 29, 2026
spot_img
Home Blog रत्नागिरी शहरात वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या ३ वाहनचालकांवर गुन्हे दाखल

रत्नागिरी शहरात वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या ३ वाहनचालकांवर गुन्हे दाखल

रत्नागिरी:- शहरात रहदारीस अडथळा ठरणाऱ्या तीन वाहनचालकांवर शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्यायसंहितेच्या कलम २८५ नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. २७ ऑगस्ट रोजी संध्याकाळच्या सुमारास पोलिसांनी ही कायदेशीर कारवाई केली.

२७ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ७:०५ वाजताच्या सुमारास जेलनाका ते भाटये जाणाऱ्या रस्त्यावरील जयस्तंभ, नगर वाचनालयासमोर आरोपी अक्षय मोहन राऊत (३२, रा. गोडबोले स्टॉप, रत्नागिरी) याने आपली मोटारसायकल (क्र. एमएच ०८ एएन २८०३) रस्त्यावर पादचाऱ्यांना व वाहनांना अडथळा निर्माण होईल अशा बेजबाबदारपणे उभी केली होती. याप्रकरणी पोलीस नाईक पंकज यशवंत पडेलकर यांच्या फिर्यादीवरून गुन्हा नं. २९६/२०२६ दाखल करण्यात आला आहे.

त्याच दिवशी संध्याकाळी ७:५० वाजताच्या सुमारास चर्मालय चौक ते मारुती मंदिर जाणारे रोडवर केक शॉप समोरील रस्त्यावर आरोपी रविकांत देवानंद कडपट्टे (३३, रा. एमआयडीसी, झाडगाव) याने आपला महिंद्रा जितो टेम्पो (क्र. एमएच ०८ डब्ल्यूपी ५६२८) सार्वजनिक रहदारीच्या रस्त्यावर पादचारी व मोटार वाहतुकीस अडथळा होईल असा लावला होता. या प्रकरणी पोलीस हवालदार शरद बाबल्या कांबळे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा नं. २९७/२०२६ नोंदवण्यात आला आहे.

रात्री ८:१० वाजताच्या सुमारास रत्नागिरी ते हातखंबा जाणाऱ्या मार्गावर मारुती मंदिर परिसरातील विवो मोबाईल शॉपीसमोर आरोपी सागर सुभाष बंदरकर (४८, रा. निवखोल पुलाजवळ, रत्नागिरी) याने आपली टाटा सुमो गाडी (क्र. एमएच ०४ ईएफ ९२३१) साळवी स्टॉपच्या दिशेने जाणाऱ्या वाहतुकीस व रहदारीस अडथळा निर्माण होईल अशी उभी केली होती. याप्रकरणी पोलीस हवालदार महेंद्र काशिनाथ खापरे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा नं. २९८/२०२६ दाखल करण्यात आला आहे. शहरातील रस्त्यांवर वाहने शिस्तीत उभी न करता रहदारीला अडथळा निर्माण करणाऱ्या वाहनचालकांवर रत्नागिरी शहर पोलिसांनी एकाच दिवशी सडकून कारवाई केल्यामुळे वाहनचालकांमध्ये खळबळ उडाली आहे.