रत्नागिरी:- रत्नागिरी शहर व्यापारी महासंघाकडून देण्यात येणाऱ्या वैकुंठरथाचे रविवारी लोकार्पण करण्यात आले. भैरीबुवाच्या दरबारात हा लोकार्पण सोहळा पार पडला. यावेळी कोरोना योद्धे, शहरातील प्रत्येक क्षेत्रातील व्यावसायिक आणि व्यापारी महासंघाच्या कर्तबगार पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
शहर व्यापारी महासंघाकडून रत्नागिरी शहरातील नागरिकांसाठी वैकुंठरथ ही संकल्पना हाती घेण्यात आली. नाममात्र शुल्क आकारून ही सेवा शहरवासीयांना पुरवण्यात येणार आहे. यासाठी माजी नगरसेवक निमेश नायर यांचे मोठे सहकार्य व्यापारी महासंघाला झाले. वैकुंठरथ उभा करून ठेवण्यासाठी जागा नगर परिषदेने उपलब्ध करून दिली. यासाठी पुढाकार घेणाऱ्या निमेश नायर यांना यावेळी सन्मानित करण्यात आले. या वैकुंठरथाचे बारा वाड्यांचा राजा श्री देव भैरीच्या दरबारात या वैकुंठरथाचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी व्यापारी महासंघाचे पदाधिकारी, भैरी बुवा देवस्थानचे प्रमुख पदाधिकारी, सत्कारमूर्ती उपस्थित होते.
सुरुवातीला श्री देव भैरीच्या गुरुवांकडून गाऱ्हाणे घालण्यात आले.यानंतर व्यापारी महासंघाचे हेमंत वणजु यांनी प्रस्तावना केली. व्यापारी महासंघाकडून करण्यात आलेल्या कामाचा लेखाजोखा त्यांनी यावेळी मांडला. कोरोना काळात रिक्षावाले, हमाल आदी गरजूना ३ लाखांचे धान्य वाटप व्यापारी महासंघाकडून करण्यात आले. तोक्ते चक्रीवादळात दापोलीत जाऊन महासंघाने मदत केली. चिपळूण महापुरावेळी जीवनावश्यक वस्तू घेऊन संघटना पूरवासीयांच्या मदतीला पोहचली. कोरोना काळात पोलिसांच्या मदतीला देखील संघटना धावली असे वणजु म्हणाले.
यावेळी वैकुंठरथाची गरज आणि महत्व वणजु यांनी पटवून दिले. शहरवासीयांच्या मदतीसाठी हा उपक्रम व्यापारी महासंघाने हाती घेतला. यासाठी प्रत्येक व्यापाऱ्याने खारीचा वाटा उचलला आणि मदत केली. वैकुंठरथाची सेवा स्वीकारल्यानंतर देण्याचा मोबदला हा ऐच्छिक विषय आहे. यासाठी स्वतंत्र बँक खाते उघडण्यात आले आहे. यासाठी क्यूआरकोड प्रक्रिया उपलब्ध करून देण्यात आली आहे. या कार्यक्रमावेळी आनंद बंदरकर यांनी गाडीचा पूर्ण मेंटेनन्स लाईफ टाईम फ्री करून देण्याची घोषणा केली. यावेळी अंत्यविधीकरीता शहरातील विविध भागात काम करणाऱ्या 60 स्वयमसेवकांचा सत्कार करण्यात आला. सर्वसोयींनी सुसज्ज वैकुंठरथ रविवारपासून रत्नागिरीकारांच्या सेवेत अर्पण करण्यात येत असल्याची घोषणा यावेळी भैरी देवस्थानचे मुन्ना सुर्वे यांनी केली.









