चिपळूण:- मागील १० दिवसांपासून चिपळूण बचाव समितीच्या माध्यमातून चिपळूणातील नागरिक प्रांत कार्यालया समोर आंदोलनाला बसले आहेत. वशिष्ठी आणि शिव नदीतील गाळ उपसा व चिपळूण शहराला वाचवा तसेच निळी व लाल पूर रेषा रद्द करा या मागण्यांसाठी हे आंदोलन सुरु आहे. चिपळूणकरांच्या या आंदोलनाला आता रत्नागिरी शहर व्यापारी महासंघाने देखील आपला पाठींबा दिला आहे. व्यापारी महासंघाचे अध्यक्ष गणेश भिंगार्डे यांनी पाठिंब्याचे पत्र चिपळूण बचाव समितीला दिले.
यावेळी रत्नागिरी खबरदारचे संपादक हेमंत वणजु, सौरभशेठ मलुष्टे, मकरंद खातू अमोल डोंगरे, अरुण भोजने , किशोर रेडीज, उदय ओतारी, सतीश कदम आदी उपस्थित होते. कोरोना काळापासून आलेल्या संकटांवर मात करण्यासाठी रत्नागिरी व चिपळूण मधील व्यापारी संघटना एकत्र येऊन संघर्ष करीत आहेत. या पावसाळ्यात आलेल्या पुराने चीपाळूनातील व्यापाऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. शासनाने चिपळूणकरांच्या या मागण्यांकडे प्राधान्याने लक्ष देऊन नद्यांमधील गाल काढावा व चिपळूण शहराला वाचवावे अशी मागणी रत्नागिरी शहर व्यापारी महासंघाने देखील केली आहे. मिळालेल्या निधीचा विनियोग योग्य पद्धतीने करून गाळ काढण्याच्या कामात भ्रष्टाचार होणार नाही याकडे चिपळूणकरांनी लक्ष ठेवावे असे आवाहन देखील करण्यात आले.