रत्नागिरी पोलीस दलाचा राज्यात डंका!

‘ई-गव्हर्नन्स’ सुधारणा कार्यक्रमात जिल्हा राज्यात पाचवा

रत्नागिरी:- महाराष्ट्र शासनाच्या १५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमांतर्गत, रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाने राज्यात उल्लेखनीय यश संपादन केले आहे. ‘सर्वोत्तम पोलीस अधीक्षक कार्यालय’ या श्रेणीमध्ये महाराष्ट्रातील ३४ पोलीस अधीक्षक कार्यालयांच्या स्पर्धेत रत्नागिरीने राज्यात ५वा क्रमांक पटकावला आहे. प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून २६ जानेवारी २०२६ रोजी शासनाने हे निकाल जाहीर केले.

पारदर्शक आणि गतिमान कामकाजाचे फलित
शासकीय कामकाज अधिक पारदर्शक, कार्यक्षम आणि नागरिकाभिमुख व्हावे, यासाठी हा विशेष कार्यक्रम राबवण्यात आला होता. या उपक्रमांतर्गत ‘क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडिया’ मार्फत राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांचे कडक निकषांवर मूल्यमापन करण्यात आले. रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने २०० पैकी १४४.२५ गुण मिळवून या मानांकनात अव्वल पाचमध्ये स्थान मिळवले.

मूल्यमापनाचे सात मुख्य निकष ठरवण्यात आले होते. यामध्ये अधिकृत वेबसाईटची अद्ययावतता, ‘आपले सरकार’ प्रणालीचा प्रभावी वापर, ई-ऑफिस प्रणालीची अंमलबजावणी, कार्यालयीन डॅशबोर्ड, व्हॉट्सॲप चॅटबॉटचा वापर, एआय व ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा वापर, जीआयएस तंत्रज्ञानाचा कार्यक्षम वापर यांचा समावेश होता.

अधीक्षक नितीन बगाटे यांच्या नेतृत्वाचा विजय

पोलीस अधीक्षक श्री. नितीन दत्तात्रय बगाटे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाखाली रत्नागिरी पोलीस दलात आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्यात आला. या यशाबद्दल अधीक्षक बगाटे यांनी सर्व पोलीस अधिकारी आणि अंमलदारांचे अभिनंदन केले आहे. “भविष्यातही ई-गव्हर्नन्सच्या माध्यमातून नागरिकांना अधिक उत्कृष्ट सेवा देण्याचा आमचा संकल्प आहे,” असे यावेळी सांगण्यात आले.