रत्नागिरी:- गुन्हेगारांचा शोध घेणे असो वा बेपत्ता व्यक्तींची ओळख पटवणे, आता रत्नागिरी जिल्हा पोलीस अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने गुन्हेगारांच्या एक पाऊल पुढे राहिले आहेत. रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने विकसित केलेले रेडस अँप हे ॲप सध्या महाराष्ट्र पोलीस दलात क्रांती घडवत आहे.
पोलीस अधीक्षक श्री. नितीन दत्तात्रय बगाटे यांच्या संकल्पनेतून आणि मार्गदर्शनाखाली १५ डिसेंबर २०२५ रोजी हे ॲप कार्यान्वित करण्यात आले. कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित हे तंत्रज्ञान विशेषतः गुंतागुंतीच्या गुन्ह्यांची उकल करण्यासाठी डिझाइन करण्यात आले आहे. हे ॲप केवळ फोटो मॅचिंगपुरते मर्यादित नसून त्याचे कार्य अत्यंत सखोल आहे.१०८ प्रकारे फोटो पुनर्निर्मिती: पाहिजे असलेल्या किंवा फरारी आरोपींचे, तसेच बेपत्ता व्यक्तींचे जुने फोटो १०८ वेगवेगळ्या तांत्रिक पद्धतींनी पुनर्निर्मिती करण्याची क्षमता यात आहे. विद्रूप झालेल्या किंवा ओळख पटवण्यास कठीण असलेल्या मृतदेहांच्या चेहऱ्याची मांडणी करून त्यांचा मूळ चेहरा कसा असावा, याचा अचूक अंदाज हे ॲप देते. यामुळे वारसदार शोधणे सोपे झाले आहे.
रेखाचित्रांचे रुपांतर: हाताने काढलेल्या रेखाचित्रांना जिवंत फोटोंमध्ये रूपांतरित करण्याचे कामही या तंत्रज्ञानामुळे सुलभ झाले आहे.
रत्नागिरी पोलिसांनी विकसित केलेल्या या तंत्रज्ञानाचा फायदा आता संपूर्ण महाराष्ट्राला होत आहे. सध्या नागपूर, सातारा, पालघर आणि अहिल्यानगर या जिल्ह्यांचे पोलीस दल देखील गुन्हे तपासासाठी रेड अँपची मदत घेत आहेत. अनेक प्रलंबित प्रकरणांमध्ये या ॲपमुळे मृतदेहांची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आले आहे.









