रत्नागिरी पोलिसांची मोठी कारवाई; ३.२७ लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त

कोल्हापूरच्या एकाला ठोकल्या बेड्या

रत्नागिरी:- रत्नागिरी शहरात प्रतिबंधित गुटखा आणि पान मसाल्याची तस्करी करणाऱ्यांविरुद्ध शहर पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. कोल्हापूरहून विक्रीसाठी आणलेला सुमारे ३ लाख २७ हजार ९०४ रुपये किमतीचा गुटखा पोलिसांनी जप्त केला असून, या प्रकरणी एका आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातून एक इसम मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित गुटखा आणि पान मसाला घेऊन रत्नागिरी शहरात विक्रीसाठी येणार असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक विवेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एक विशेष पथक तयार करण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी पहाटेच्या सुमारास शहरात सापळा रचला. यावेळी संशयास्पद हालचाल दिसताच पोलिसांनी इको गाडी किंमत ३,५०,००० अडवून तिची झडती घेतली. या झडतीमध्ये पोलिसांना मोठ्या प्रमाणात गुटखा व पान मसाल्याचा साठा मिळून आला. यामध्ये गुटखा व पान मसाला ३,२७,९०४ रुपये, इको वाहन ३,५०,००० रुपये असा एकूण ६,७७,९०४ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी शरद गणपती भंडारे (रा. सरुड, ता. शाहूवाडी, जि. कोल्हापूर) याला ताब्यात घेतले असून त्याच्यावर रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, अपर पोलीस अधीक्षक महामुनी, आणि उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश माईनकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विवेक पाटील, पोलीस उपनिरीक्षक सागर शिंदे, राहुल जाधव, रणजित जाधव आणि शरद जाधव यांच्या पथकाने केली आहे.