रत्नागिरी पंचायत समिती सभापती पदासाठी आज निवडणूक

रत्नागिरी:- रत्नागिरी पंचायत समिती सभापतीपदाची निवड मंगळवारी (ता. 16) होणार आहे. खुल्या गटातील महिलांसाठी आरक्षण असल्यामुळे शिवसेनेकडुन इच्छुकांची भाऊगर्दी आहे. यामध्ये संजना माने यांना संधी मिळेल अशी शक्यता वर्तविली जात आहे.

पंचायत समितीवर शिवसेनेचे प्राबल्य असून 19 पैकी 17 सदस्य आहेत. उर्वरित दोन सदस्य भाजपचे आहेत. सर्वांना संधी देण्याच्या उद्देशाने सव्वा वर्षाचा कालावधी दिला जात आहे. त्यामुळे प्राजक्ता पाटील यांनी नुकताच सभापतीपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर नवीन उमेदवार कोण याबाबत सर्वांना उत्सुकता लागली आहे. दहा महिन्यानंतर पंचायत समित्यांची निवडणुक होणार आहे. त्यामुळे शेवटच्या टप्प्यात सभापतीपद पदरात पाडण्यासाठी इच्छुकांचे प्रयत्न सुरु आहेत. यामध्ये वाटद गणातून निवडून आलेल्या संजना माने यांचे नाव सभापतीपदासाठी आघाडीवर असल्याची चर्चा सुरु आहे. त्याबरोबरच कुवारबावच्या जयश्री जोशी यांनाही संधी मिळू शकते. खुला गट महिलांसाठी आरक्षण असल्यामुळे हातखंबा येथील साक्षी रावणंग, फणसवळे गणातील आकांक्षा दळवी तर गोळपमधील प्रेरणा पांचाळ यांच्याही नावाची चर्चा होती. रावणंग यांनी मासिक सभांमध्ये चांगले विषय मांडले होते. सभापतीपदासाठी त्यांचे तगडे आव्हान आहे; परंतु जिल्हा परिषद समाजकल्याण पदासाठी परशुराम कदम यांना संधी दिली जाणार असेल तर रावणंग यांचे नाव मागे पडू शकते. यापुर्वी वरवडेतील मेघना पाष्टे, मिरजोळेतील विभांजली पाटील आणि फणसोप गणातील प्राजक्ता पाटील यांना संधी मिळाल्याने हातखंबा गणाकडे सभापतीपद जाऊ शकते.