रत्नागिरी:- रत्नागिरी नगर परिषदेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक राजकीय घडामोडी घडून आल्या. सोमवारी पहाटे शिवसेना शिंदे गटाकडून शिल्पा सुर्वे यांना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी जाहीर करण्यात आली. याआधी मध्यरात्री अचानक बशीर मुर्तझा यांनी शरद पवार गटाला सोडचिठ्ठी देत अजित पवार गटात प्रवेश करत त्यांच्या पत्नी वहिदा मुर्तझा यांनी नगराध्यक्ष पदासह नगरसेवक पदांवर देखील उमेदवार उभे केल्याने महायुतीमध्ये फूट पडल्याचे उघड झाले आहे.
नगरपालिका निवडणुकीसाठी सोमवारी दिवसभरात ७ अर्ज नगराध्यक्षपदासह ८९ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. तब्बल नऊ वर्षांनी होत असलेल्या रत्नागिरी नगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस होता. आजच्या दिवशी महायुती आणि महाविकास आघाडी यांच्याकडून नगराध्यक्षपदाठी उमेदवारी अर्ज दाखल केले जाणार होते. महाविकास आघाडीकडून शिवानी सावंत-माने यांना उमेदवारी मिळणार असल्याचे निश्चित होते; मात्र महायुतीकडून पाच नावे चर्चेत होती. अखेरच्या चर्चेनंतर रात्री उशिरा सौ. शिल्पा सुर्वे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.
आज शेवटच्या दिवशी महिला सर्वसाधारण गटासाठी आरक्षित असलेल्या नगराध्यक्ष पदासाठी शिवानी माने, शिल्पा सुर्वे यांच्यासह संध्या कोसुंबकर, प्राजक्ता किणी, तौफिका मजगावकर, शिल्पा सुर्वे, सुष्मिता शिंदे आणि वहिदा मुर्तुजा आज जणांचे अर्ज प्राप्त झाले.
त्याचप्रमाणे अपक्ष २८, शिवसेना (उबाठा) २१, शिवसेना १६, प्रहार जनशक्ती २, राष्ट्रवादी अजित दादा १३, राष्ट्रवादी शरद पवार ५, काँग्रेस ३ आणि बसपा १ असे नगरसेवक सेवक पदासाठी एकूण ८९ अर्ज प्राप्त झाले आहेत.
त्यामुळे प्रमुख लढत महाविकास आघाडी दरम्यान, नगरपालिकेच्या ३२ नगरसेवक आणि १ नगराध्यक्ष अशा एकूण ३३ जागांसाठी आतापर्यंत नगराध्यक्ष पदासह एकूण १३३ अर्ज दाखल झाले आहेत. असे असले तरी ही निवडणूक महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशीच होणार असून, नगराध्यक्षपदासाठी देखील ठाकरे शिवसेना विरुद्ध शिंदे शिवसेना अशीच प्रमुख लढत होणार हे स्पष्ट आहे.









