रत्नागिरी:- रत्नागिरी शहराच्या मुख्य मार्गावर बेशिस्तपणे लक्झरी बस उभी करून वाहतुकीस अडथळा निर्माण केल्याप्रकरणी एका चालकावर रत्नागिरी शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राहुल प्रकाश मोरे (वय ४५, रा. नेचल, ता. पाटण, जि. सातारा) असे गुन्हा दाखल झालेल्या चालकाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना ४ जुलै रोजी रात्री ८:४५ च्या सुमारास घडली. जेलनाका ते आठवडा बाजार जाणार्या रस्त्यावर, रत्नागिरी नगरपरिषदेसमोर आरोपीने आपली लक्झरी ट्रॅव्हल्स (क्रमांक एम.एच.०८-ए.पी.-९८७६) भररस्त्यात उभी केली होती. ही बस अशा प्रकारे उभी केली होती की, त्यामुळे रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या वाहनांना तसेच पादचाऱ्यांना मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होत होता.
गस्तीवर असलेल्या रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार दिनेश महादेव हरचकर यांनी ही बेशिस्त वाहतूक निदर्शनास येताच तात्काळ कारवाई केली. या प्रकरणी हवालदार हरचकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून, रत्नागिरी शहर पोलीस स्थानकात भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम २८५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रात्री ११:३९ वाजता या गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस करत आहेत.









