Saturday, September 26, 2026
spot_img
Home रत्नागिरी रत्नागिरी नगर पालिकेची अतिक्रमण हटाव मोहीम थंडावली

रत्नागिरी नगर पालिकेची अतिक्रमण हटाव मोहीम थंडावली

रत्नागिरी:- रत्नागिरी शहरामध्ये पादचाऱ्यांसाठी तयार करण्यात आलेल्या फुटपाथवर उभारण्यात आलेल्या अनधिकृत टपऱ्या हटवण्याची नगरपालिकेची मोहीम गणेशोत्सवानंतर पुन्हा सुरू होणार की थंडावली, असा थेट सवाल शहरातील नागरिकांमधून विचारला जात आहे. गणेशोत्सवापूर्वी सुरू झालेली ही अतिक्रमण विरोधी मोहीम सणाचे कारण देत तात्पुरती स्थगित करण्यात आली होती. सण संपल्यानंतर ही कारवाई पुन्हा वेगाने हाती घेतली जाईल, असे पालिकेकडून सांगण्यात आले होते; मात्र आता उत्सव संपूनही कारवाईबाबत शांतता असल्याने नागरिकांमध्ये साशंकता निर्माण झाली आहे.

शहरामध्ये स्मार्ट सिटी संकल्पनेच्या अंतर्गत मुख्य रस्त्यांचे डांबरीकरण, रुंदीकरण आणि सुशोभीकरण वेगाने सुरू आहे. याअंतर्गत नागरिकांना चालण्यासाठी प्रशस्त फुटपाथ बांधण्यात येत आहेत. मात्र, एकीकडे शहर सुशोभीकरणाची कामे सुरू असताना दुसरीकडे याच फुटपाथवर अनधिकृत टपऱ्या उभारण्याचे पेव मोठ्या प्रमाणावर फुटले होते. त्यामुळे शहरातील हे फुटपाथ नेमके सर्वसामान्य पादचाऱ्यांना चालण्यासाठी आहेत की अनधिकृत टपरीचालकांच्या धंद्यासाठी, असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत होते.

पादचाऱ्यांची होणारी मोठी गैरसोय आणि फुटपाथवरील अतिक्रमणांचे वाढते जाळे लक्षात घेऊन नगराध्यक्षा शिल्पा सुर्वे यांनी अत्यंत धाडसी निर्णय घेत या अनधिकृत टपऱ्या हटवण्याचे आदेश दिले होते. नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेतही बहुसंख्य नगरसेवकांनी या निर्णयाला एकमुखाने अनुमोदन दिले होते. त्यानुसार गणेशोत्सवापूर्वी पालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने शहराच्या वरील भागामध्ये म्हणजेच छत्रपती शिवाजीनगर परिसरातील फुटपाथवरील अनधिकृत टपऱ्यांवर धडक कारवाई करत त्या उचलल्या होत्या.

शिवाजीनगर भागातील कारवाईनंतर सणाचे कारण देत जुना माळनाका परिसराच्या खालील भागातील मोहीम पालिकेने तात्पुरती थांबवली होती. गणेशोत्सव संपताच शहरातील उर्वरित भागातील टपऱ्या हटवल्या जातील, असे त्यावेळी स्पष्ट करण्यात आले होते. आता बाप्पाचे विसर्जन होऊन उत्सव शांततेत पार पडला आहे. त्यामुळे पालिकेचे अतिक्रमण विरोधी पथक पुन्हा सक्रिय होऊन शहराच्या सखल भागातील फुटपाथ मोकळे करणार की ही मोहीम राजकीय अथवा अन्य दबावामुळे बासनात गुंडाळली जाणार, याकडे आता समस्त रत्नागिरीकरांचे लक्ष लागले आहे.