रत्नागिरी:- मनसेे नेते अमित ठाकरे यांच्या रत्नागिरी दौर्यात मनसेचे दोन गट आमनेसामने आले. आम्ही नूतन जिल्हाध्यक्ष आणि तालुकाध्यक्ष यांच्यासोबत काम करणार नाही, असे सांगून नाराज गटाने आपली खदखद अमित ठाकरेंच्या समोर व्यक्त केली. यावेळी ठाकरे यांनी पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी चर्चा करून पुढील निर्णय होईल, असे सांगून दोन्ही गटाला शांत केले. दरम्यान नाराज गटाने मोठे शक्तीप्रदर्शन करून आपल्यासोबत किती कार्यकर्ते आहेत हे मनसे नेत्यांना दाखवून दिले.
पक्षात झालेले फेरबदल यावरुन मनसेमध्ये तणावाचे वातावरण होते. त्यातच माजी जिल्हाध्यक्ष जितेंद्र चव्हाण यांच्या समर्थकांनी यापुर्वीची जाहीर नाराजी व्यक्त केली होती. नवीन पदाधिकारी निवडताना स्थानिक पातळीवर कोणालाही विश्वासात घेतले नाही, असा आरोप या नाराज गटाने केला होता. विद्यमान उपजिल्हाध्यक्ष रुपेश सावंत यांच्या नेतृत्वात मनसे कार्यकर्त्यांनी आपली नाराजी वेळोवेळी व्यक्त केली होती. त्याचा गुरुवारी बांध फुटला आणि नेत्यांसमोरच हमरीतुमरीचा प्रकार घडला.
मनसेचे नेते तथा मनसे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे हे गुरुवारी रत्नागिरी दौर्यावर आले. पावस येथे त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. तेथून अमित ठाकरे यांच्याहस्ते गोगटे कॉलेज युनिटचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी मोठ्याप्रमाणात महाविद्यालयीन विद्यार्थी अमित ठाकरे यांच्या स्वागतासाठी कॉलेज परिसरात जमले होते. युनिटचा शुभारंभ झाल्यानंतर अमित ठाकरे शासकीय विश्रामगृहात दाखल झाले. त्यानंतर कार्यकर्त्यांशी संवाद साधत असताना नाराज गट त्याठिकाणी आला व त्यांनी आपली खदखद आपल्या नेत्यासमोर व्यक्त केली.
नूतन जिल्हाध्यक्ष आणि तालुकाध्यक्ष यांच्यावर नाराजी व्यक्त करत त्यांनी या पदाधिकार्यांसोबत आम्ही काम करणार नाही, अशी भूमिका मनसेचे नेते अमित ठाकरे यांच्यासमोर मांडली. यावेळी कोणासोबत किती कार्यकर्ते आहेत? हे अमित ठाकरे यांनी प्रत्यक्ष पाहिले आणि दोन्ही गटाला योग्य त्या सूचना दिल्या. तुमचा विषय मी साहेबांकडे मांडतो, साहेबच त्यावर निर्णय घेतील, अशी भूमिका दोन्ही गटांबाबत अमित ठाकरे यांनी घेतली.
दरम्यान, दोन्ही गट अमित ठाकरे यांच्यासमोर आल्यानंतर दोन्ही बाजूने हमरीतुमरी झाली. जो तो आपली बाजू प्रकर्षाने मांडू लागला. काहींनी तर जुनी उणीदुणी काढण्याचा प्रयत्न केला. हे चित्र पाहून मनसेचे नेते अमित ठाकरे यांनी नाराजी व्यक्त केली. आपल्याला पक्ष वाढवायचा आहे, साहेब जो आदेश देतील त्या आदेशाचे पालन माझ्यासह सर्वांनाच करावे लागेल, असे त्यांनी सर्वच कार्यकर्त्यांना ठणकावून सांगितले.
दरम्यान, गोगटे जोगळेकर महाविद्यालयातील पहिल्या युनिटचा शुभारंभ झाल्यानंतर अमित ठाकरे यांनी समाधान व्यक्त केले. हे युनिट उभं करण्यासाठी पुढाकार घेतलेल्या चैतन्य शेंडे या तरुण कार्यकर्त्याचे तोंडभरून कौतुक अमित ठाकरे यांनी केले. तर शासकीय विश्रामगृहात अमित ठाकरे यांचे स्वागत करताना मनविसेचे जिल्हाध्यक्ष गुरुप्रसाद चव्हाण यांच्या नेतृत्त्वात जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आले.