पालीतून गणातून बिनविरोध निवड; हातखंबा गटातून सेनेत बंडखोरी
रत्नागिरी:- जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी नामनिर्देक्षण पत्र भरण्यासाठी उमेदवारांची मोठी गर्दी उसळली होती. माजी समाजकल्याण सभापती पर्शुराम कदम यांचा ऐनवेळी शिवसेनेकडून पत्ता कापण्यात आल्याने त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. दरम्यान, पालकमंत्री उदय सामंत यांचे स्वीय सहाय्यक नेताजी पाटील यांनीही शिवसेनेमधून गोळप पंचायत समिती गणासाठी अर्ज दाखल करीत शड्डू ठोकला आहे. दरम्यान रत्नागिरी तालुक्यातील 20 पं.स. गणासाठी 51 अर्ज आले असून जि.प.च्या 10 गटांसाठी 38 अर्ज दाखल झाले आहेत.
राज्याचे उद्योगमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री आणि शिवसेना नेते उदय सामंत हे सध्या दावोस येथे असून, त्यांच्या सूचनेनुसार रत्नागिरी तालुक्यातील पंचायत समिती व जिल्हा परिषदेची शेवटची यादी रात्री जाहीर करण्यात आली. हातखंबा जिल्हा परिषद गटामधून इच्छूक असलेले माजी जि.प. समाजकल्याण सभापती पर्शुराम कदम यांचा पत्ता ऐनवेळी कापण्यात आला. विशेषत: शिवसेनेचे रत्नागिरी तालुकाप्रमुख महेश उर्फ बाबू म्हाप यांच्या हातखंबा गावामधूनच कदम यांना विरोध झाल्याची चर्चा सुरु झाली आहे. मागील जि.प.च्या कार्यकाळात पर्शुराम कदम यांनी जनमाणसात चांगले काम केले होते. मात्र त्यांना डावलण्यामध्ये जातीय राजकारणाचा रंग असल्याची चर्चाही आता सुरु झाली आहे. दरम्यान, पर्शुराम कदम यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला असून हातखंब्यामधील एक गट त्यांच्या पाठीशी उभा राहिला आहे.
शेवटच्या दिवशी गोळप पंचायत समिती गणामधून पालकमंत्री उदय सामंत यांचे स्वीय सहाय्यक नेताजी पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. मागील सात-आठ वर्ष या गोळपमधील जि.प. गटात त्यांनी पालकमंत्र्यांच्या माध्यमातून अनेक विकास कामे केली होती. त्यामुळे त्यांना पंचायत समिती गणामध्ये उभे करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली होती. त्यामुळे त्यांना गोळपमधून उमेदवारी देण्यात आली आहे. याठिकाणी त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित राहिले होते.
रत्नागिरी तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या 10 गटांमध्ये 38 उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत तर पंचायत समितीच्या 20 गणांसाठी 51 उमेदवारांनी अर्ज दागल केले आहेत. गुरुवारी अर्जांची छाननी होणार असून 27 जानेवारी दुपारी 3 वाजेपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत आहे.
राज्यात पहिल्याच पंचायत समितीमध्ये रत्नागिरीत बिनविरोध
रत्नागिरी तालुक्यातील नाणिज पंचायत समिती गणामधून शिवसेनेच्यावतीने डॉ. पद्मजा संजय कांबळे यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यांच्या विरोधात कोणत्याच पक्षाने उमेदवार न दिल्याने त्या बिनविरोध झाल्या आहेत. महाराष्ट्रात त्या पंचायत समितीच्या निवडणुकीत पहिल्या बिनविरोध उमेदवार ठरल्या आहेत.









