रत्नागिरी:- जिल्ह्यात मागील पाच दिवसापासून टेस्टिंगचे प्रमाण पाच हजारच्यावरती गेले आहे. यात सर्वाधिक टेस्टिंग या चिपळूण, संगमेश्वर व खेड तालुक्यात झाल्या असून रत्नागिरी तालुका मात्र टेस्टिंगमध्ये कमी पडताना दिसत आहे. अन्य तालुके एक हजारचा टेस्टिंग टप्पा गाठत असताना रत्नागिरी मात्र आठशे-साडेआठशेच्या आसपास रेंगाळला आहे. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री ना. उदय सामंत यांच्याच तालुक्यात लोकसंख्येच्या तुलनेत टेस्टिंग कमी होताना दिसत असून आरोग्य यंत्रणेला बुस्टर डोस देण्याची आवश्यकता व्यक्त केली जात आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील पॉझिटिव्हिटी दर नियमित 17 टक्केच्या वर गेला होता. हा दर कमी करण्यासाठी टेस्टिंगची संख्या वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला. जिल्ह्यात उच्च व तंत्रशिक्षण मंत्री ना. उदय सामंत यांनी यात विशेष लक्ष घातल्यामुळे मागील पाच-सहा दिवसापासून कोरोना टेस्टिंगची संख्या वाढली आहे. पाच हजारहून अधिक टेस्टिंग होत असल्याने कोरोना रुग्णांचे प्रमाण दहा टक्केच्या आसपास आले आहे.
जिल्ह्यात सध्या संगमेश्वर, चिपळूण, खेड तालुक्यांनी टेस्टिंगमध्ये आघाडी घेतली आहे. चिपळूण व संगमेश्वरमधील आरोग्य यंत्रणेने तर सरासरी हजारहून अधिक टेस्टिंग करण्याचे काम हाती घेतले आहे. मात्र उच्च व तंत्र शिक्षण मंत्र्यांच्या रत्नागिरी तालुक्यात गेल्या पाच दिवसात सरासरी आठशेच टेस्टिंग झाले आहे.त्यातही रत्नागिरी तालुक्यात पाचही दिवसात रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. जिल्ह्यात टेस्टिंग वाढत असताना रत्नागिरी तालुक्यातही टेस्टिंग वाढवण्याची गरज आहे. जिल्ह्यातील सर्वाधिक लोकसंख्याही रत्नागिरी तालुक्यात आहे. आरोग्य यंत्रणा, प्रशासनाची मुख्यालयेही रत्नागिरीत असताना रत्नागिरी तालुक्यातील टेस्टिंग कमी होत असल्याने उच्च व तंत्र शिक्षण मंत्र्यांकडून तालुका आरोग्य यंत्रणेला बुस्टर डोसची आवश्यता दिसून येत आहे.
रत्नागिरी तालुक्यात पुढील चार-पाच दिवसात किमान बाराशे ते दीड हजारपर्यत टेस्टिंग होणे गरजेचे आहे. अन्य तालुक्याच्या तुलनेत रत्नागिरी तालुक्याचेही टेस्टिंग वाढल्यास 10 हजारच्या आसपासचे टेस्टिंग करण्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्र्यांचे उद्दिष्ठ पूर्ण होऊ शकते. गुहागर, राजापूर, लांजा तालुक्यातही टेस्टिंग वाढवण्याची आवश्यकता आहे.









