Thursday, July 2, 2026
spot_img
Home रत्नागिरी रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला, 5 जुलैपर्यंत ऑरेंज अलर्ट

रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला, 5 जुलैपर्यंत ऑरेंज अलर्ट

रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या २४ तासांत पावसाचा जोर प्रचंड वाढला असून संपूर्ण जिल्ह्याला पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे. 1 जुलै रोजी संपलेल्या २४ तासांत जिल्ह्यात 97.37 मिमी सरासरी पावसाची नोंद येथील जिल्हा नियंत्रण कक्षाकडे करण्यात आली आहे. मंडणगड तालुक्यात सर्वाधिक 117.25 मिमी पावसाची नोंद झाली आहे. आतापर्यंत एकूण 650. 38 मिलीमीटर पाऊस पडला आहे.

पावसाने रविवार रात्रीपासून जोरदार सरींना सुरूवात केली आहे. मंगळवारीही दिवसभर पावसाचा जोर कायम होता. बुधवारी सकाळी काही प्रमाणात उसंत घेतल्यानंतर सकाळी अकरा वाजल्यापासून पावसाचा जोर पुन्हा वाढला. दिवसभर पावसाने आपली हजेरी कायम ठेवली होती. चार दिवस सलग कोसळणारा पाऊस सर्वच तालुक्यांमध्ये समाधानकारक पडत आहे. बुधवारी सकाळी संपलेल्या २४ तासात मंडणगड तालुक्यात सर्वाधिक 117.25 मिमी पावसाची नोंद झाली आहे. दापोली तालुक्या 107.14 मिमी, खेड 86.57 मिमी, चिपळूण 93.88 मिमी, गुहागर 108 मिमी, संगमेश्वर 73.41 मिमी, रत्नागिरी 94.11 मिमी, लांजा 89.60 मिमी आणि राजापूर तालुक्यात 106.37 मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे.

या दमदार पावसामुळे जिल्ह्यातील बळीराजा सुखावला असून रखडलेल्या भातलावणीच्या कामांना आता प्रचंड वेग आला आहे. मात्र, दुसरीकडे सतत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतुकीचा वेग मंदावला असून, ग्रामीण भागातील जनजीवन अंशतः विस्कळीत झाले आहे. संगमेश्वर तालुक्या महामार्गाच्या रखडलेल्या आणि अर्धवट स्थितीतील कामामुळे महामार्गालगतच्या दुकानांना आणि घरांना मोठा फटका बसला आहे. चिखलयुक्त पाणी अनेक दुकाने आणि घरांमध्ये शिरल्याने ग्रामस्थांचे प्रचंड हाल झाले आहेत.

जिल्ह्यात पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. 5 जुलैपर्यंत जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. या कालावधीत ​घाटावर आणि कोकणात या काळात दरडी कोसळण्याचा आणि सखल भागात पूरसदृश परिस्थिती निर्माण होण्याचा मोठा धोका आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणतर्फे निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी सर्व नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.