रत्नागिरी जिल्ह्यात आढळले ९ कुष्ठरुग्ण

रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्यात १६ ते २० डिसेंबर या कालावधी दरम्यान कुष्ठमुक्त सुरक्षित महाराष्ट्र (कुसुम) अंतर्गत आरोग्य विभागाकडून कुष्ठरुग्ण शोध मोहीम यशस्वीरीत्या राबविण्यात आली. त्यामध्ये केवळ ९ कुष्ठरुग्ण आढळले आहेत.

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेंद्र गावडे, सहाय्यक संचालक आरोग्य सेवा (कुष्ठरोग) डॉ. विवेकानंद बिराजदार यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या या मोहिमेतील कामाचे पर्यवेक्षण करणारे आरोग्य विभागाचे सबंधित अधिकारी व पर्यवेक्षक तसेच प्रत्यक्ष रुग्णांचे सर्वेक्षण व तपासणी करणारे आरोग्य कर्मचारी यांनी या मोहिमेत उत्तम काम केले. मोहिमेपुरते मर्यादित न राहता यापुढेही आरोग्य कर्मचारी आपल्या नियमित गृहभेटीत नागरिकांची तपासणी करतील. तसेच फिकट लालसर बधीर चट्टा, तेलकट गुळगुळीत चमकदार त्वचा, कानाच्या जाड पाळ्या, दुखरे मज्जातंतू, हाता-पायाला मुंग्या येणे व अशक्तपणा येणे अशी लक्षणे दिसल्यास नागरिकांनी आरोग्य विभागाशी संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांनी केले आहे.

जिल्ह्यातील चिरेखाण कामगार, आंब्याच्या बागांमधील राखणदार व तिथे वास्तव्य करणारे शेतमजूर तसेच बाहेरून कामानिमित्त आलेल्या स्थलांतरीत व्यक्ती, औद्योगिक वसाहतीतील कामगार, बांधकाम मजूर, आश्रमशाळा व वसतिगृहात राहणारे विद्यार्थी तसेच कारागृहातील कैदी यांसारख्या सर्व जोखीम ग्रस्त भागातील जवळपास ३३ हजार ७८२ लोकसंख्येपैकी ३२ हजार ८५० व्यक्तींची म्हणजे जवळपास ९७ टक्के व्यक्तींची कुष्ठरोगाबद्दल शारीरिक तपासणी करण्यात आली. त्यामधील तपासणी झालेल्या ५७३ संशयित कुष्ठरुग्णांपैकी ६ सांसर्गिक कुष्ठरुग्ण व ३ असांसर्गिक कुष्ठरुग्ण अशा एकूण ९ कुष्ठरुग्णांचे अंतिम निदान झाले आहे. या सर्वांना औषधोपचार सुरू केला आहे, अशी माहिती सहाय्यक संचालक आरोग्य सेवा (कुष्ठरोग) डॉ. विवेकानंद बिराजदार यांनी दिली.