रत्नागिरी एमआयडीसीतील ‘क्वालिटी प्रिंटर्स’च्या कार्यालयाला भीषण आग

रत्नागिरी:- रत्नागिरी एमआयडीसी परिसरातील ‘क्वालिटी प्रिंटर्स’ या प्रिंटिंग करणाऱ्या कंपनीच्या कार्यालयाला शनिवारी पहाटेच्या सुमारास भीषण आग लागली. ही आग इतक्या वेगाने पसरली की कंपनीचे मोठे नुकसान झाले आहे. या आगीत कंपनीचे कार्यालय जळून खाक झाले असून लाखोंची हानी झाली आहे.

एमआयडीसी परिसरातील क्वालिटी प्रिंटर्स कंपनीत रात्री उशिरा आग लागल्याची माहिती मिळताच एमआयडीसी अग्निशमन दलाचे जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले. या आगीत कंपनीच्या वरच्या मजल्यावरील साहित्य जळून खाक झाले. आगीची माहिती वेळेवर मिळाल्याने तळमजल्यावरील साहित्य वेळेत हलवण्यात यश आहे. आगीच्या या घटनेत कंपनीतील कम्प्युटर्स, कपाटे आणि कागदपत्रे जळून खाक झाल्याने कंपनीचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

या भीषण आगीवर मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न केले. अखेरीस, अडीच तासांच्या प्रयत्नानंतर आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवण्यात यश आले.
आगीचे कारण अद्याप अस्पष्ट असून, आग नेमकी कशामुळे लागली, याची चौकशी सुरू आहे. प्राथमिक अंदाजानुसार शॉर्ट सर्किट किंवा अन्य कारणामुळे ही आग लागली असावी, असा कयास व्यक्त होत आहे.
एमआयडीसीमध्ये रात्रीच्या वेळी लागलेल्या या मोठ्या आगीमुळे औद्योगिक परिसरात खळबळ उडाली आहे.