रत्नागिरी:- संपूर्ण जिल्हाभरात मंगळवारी रंगपंचमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. जिल्ह्याच्या ग्रामीण तसेच शहरी भागातही बाळगोपाळांसह तरुणाईही रंगपंचमी खेळताना दिसून आली. नाक्यानाक्यावर, बिल्डींग सोसायटी, नगरातून बच्चेकंपनीसह थोरामोठ्यांनीही रंगात रंगून रंगपंचमीचा आनंद लुटला. कोरोनामुळे दोन वर्षे रंगपंचमी साध्या पद्धतीने साजरी केली जात होती. यावर्षी मात्र जोरदार पद्धतीने जिल्हाभरात रंगपंचमी साजरी करण्यात आली.
दहावीच्या परीक्षेमुळे विद्यार्थ्यांना मात्र, रंगपंचमीत सहभागी होता आले नाही. रंगपंचमीमुळे दुपारनंतर बाजारपेठेतील वर्दळ पूर्णत: थंडावली होती.
रंगांचा उत्सव असलेली रंगपंचमी मंगळवारी रत्नागिरीत लहानथोरांनी मोठ्या उत्साहात साजरी केली. ढोलताशांच्या गजरासह, नाक्या-नाक्यावरील तरुणांनी आवेशात शिमगोत्सवातील फाका घालत आनंदाने रंगपंचमी साजरी केली. रंगपंचमीरंगपंचमी हा सण फाल्गुन कृष्णपंचमीला येतो. रंगपंचमीनिमित्त बाजारपेठांमध्ये विविध आकारांच्या पिचकाºया उपलब्ध होत्या. पिवळा, निळा, हिरवा आणि लाल रंगांच्या पाकिटांची विक्रीही जोरदार सुरू होती.
जनजागृतीमुळे नैसर्गिक रंगांनी रंगपंचमी साजरी करण्याकडेच अनेकांचा कल दिसून आला. दुपारी १२ वाजल्यापासूनच रंगपंचमी खेळण्यासाठी युवावर्गार्ची टोळकी शहरातून फिरु लागली. सप्तरंगांबरोबर शिंपण्याच्या रंगांत तरुणाई अक्षरश: डोक्यापासून पायापर्यंत न्हाऊन निघाली होती. कोणी ओळखता येणार नाही, इतका रंग माखण्यात आला होता.
सकाळपासूनच रंगपंचमी साजरी करण्यासाठी समुद्रकिनारे, मैदाने, सोसायट्यांच्या आवारांमध्ये तरूणाईला उधाण आले होते. शहरातील साळवी स्टॉप, शिवाजीनगर, मारुती मंदिर, बाजारपेठेत मोठ्या जल्लोषात रंगपंचमी साजरी करण्यात आली.









