रत्नागिरी:- तालुका युवासेना आयोजित आणि रत्नागिरी तालुका हौशी कबड्डी असोसिएशनच्या सहकार्याने ‘नामदार चषक’ तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेचे 7 ते 8 मे 2022 या कालावधीत आयोजन केले आहे. यामध्ये बारा संघ सहभागी होणार आहेत. राज्य, राष्ट्रीयस्तरावर खेळाडूंचा भरणा असलेल्या खेळाडूंच्या समावेशामुळे रत्नागिरीत कबड्डीचा थरार रंगणार आहे.
युवासेनेचे तालुका युवाधिकारी तुषार साळवी आणि वैभव पाटील यांच्या संकल्पनेतून उच्च व तंत्र शिक्षण मंत्री नामदार उदय सामंत यांच्या नावाने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. शनिवारी (ता. 7) सायंकाळी कुवारबाव येथील शिवसेना शाखेजवळील सुयोग सोसायटी मैदानावर याचे उद्घाटन होणार आहे. रत्नागिरीतील नामांकित संघांना निमंत्रित करण्यात आले आहे. स्पर्धेतील विजेत्या संघाला भव्य चषक आणि रोख रक्कम पारितोषिक म्हणून दिले जाणार आहे. तसेच चांगला खेळ करणार्या खेळाडूंनाही वैयक्तिक पारितोषिके देऊन गौरविण्यात येणार आहे. दर्जेदार खेळाडूंचा खेळ पाहण्यासाठी रत्नागिरीकरांनी उपस्थित रहावे असे आवाहन तालुका युवाधिकारी तुषार साळवी यांनी केले आहे.









