लोटे येथे महामार्गावरील घटना
खेड:- पत्नीला भेटण्यासाठी चिपळूणच्या दिशेने मोटारसायकलवरून जात असताना लोटे येथे महामार्गावर फिरणाऱ्या मोकाट गुराला दुचाकीची जोरदार धडक बसून खेड येथील नईम बशीर चौगुले यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. बुधवारी रात्री सुमारे नऊ वाजण्याच्या सुमारास लोटे येथील जुन्या महामार्ग पोलीस चौकीजवळ हा भीषण अपघात घडला. धडक इतकी जोरदार होती की, अपघातात दुचाकीचे मोठे नुकसान झाले असून धडक बसलेले जनावरही जागीच मृत झाले.
या अपघाताची माहिती मिळताच महामार्ग वाहतूक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. धडक इतकी जोरात होती की, हेल्मेट परिधान केलेले असतानाही नईम चौगुले यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. गंभीर जखमी अवस्थेतील नईम चौगुले यांना तातडीने चिपळूण येथील लाईफ केअर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय तपासणीनंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेने खेडसह परिसरात शोककळा पसरली आहे.
नईम चौगुले यांनी खेड बसस्थानक परिसरात त्यांनी स्वतःचे मोबाईल शोरूम उभे केले होते. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत स्वतःच्या कष्टाच्या आणि जिद्दीच्या जोरावर व्यवसाय उभा करण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू होता. मेहनत, चिकाटी आणि स्वतःच्या पायावर उभे राहण्याची जिद्द यामुळे अल्पावधीतच त्यांनी आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली होती. व्यवसायासोबतच सामाजिक क्षेत्रातही योगदान देण्याची त्यांची धडपड सुरू होती.
बुधवारी रात्री पत्नीला भेटण्यासाठी चिपळूणकडे जात असताना लोटे येथे महामार्गावर अचानक फिरणाऱ्या गुरांमुळे हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. रात्रीच्या वेळी महामार्गावर गुरे फिरत असल्याने वाहनचालकांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या अपघातामुळे महामार्गावरील भटक्या जनावरांचा प्रश्न किती गंभीर आहे, याचीही जाणीव झाली असून त्याचा तत्काळ बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.
या अपघाताची बातमी खेड शहरात पोहोचताच सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात आली. नईम चौगुले यांच्या निधनाची माहिती समजताच भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच त्यांचे मित्रपरिवार आणि परिचितांनी चिपळूण येथील रुग्णालयाकडे धाव घेतली.
नईम चौगुले यांच्या पश्चात पत्नी, कुटुंबीय, नातेवाईक व मित्रपरिवार असा परिवार आहे. त्यांच्या अकाली निधनाने कुटुंबाचा आधार हिरावला असून मित्रपरिवार आणि सामाजिक क्षेत्रातील सहकाऱ्यांमधूनही शोक व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या निधनाने खेडच्या सामाजिक व राजकीय वर्तुळातही मोठी पोकळी निर्माण झाली आहे. दरम्यान, महामार्गावर रात्रीच्या वेळी गुरे फिरत असल्याने भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी संबंधित यंत्रणांनी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे.









