पावस:- वृद्ध महिला बाथरुम मध्ये जाते असे सांगून घरातून निघून गेली. बराच वेळ परत न आल्याने नातेवाईकांनी शोध घेतला असता ती विहिराच्या पाण्यात आढळली. तिला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असता तेथील वैद्यकीय अधिकाऱ्या तपासून मृत घोषित केले.
गोपिका पांडुरंग खरडे (वय ८८, रा. खरेडवाडी मेर्वी, रत्नागिरी) असे मृत वृद्ध महिलेचे नाव आहे. ही घटना मंगळवारी (ता. १६) सकाळी सहा ते साडेसहाच्या सुमारास खरडेवाडी येथील उंबर या ठिकाणी विहिरीत निदर्शनास आली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार गोपिका या वयोवृद्ध असल्याने आजारी होता. सकाळी बाथरुमला जाते म्हणून सांगून गेल्या मात्र बराचवेळ परत आल्या नाहीत म्हणून नातेवाईकांनी शोधा-शोध केली असता त्या उंबर या ठिकाणी असलेल्या विहिरीत सापडल्या. त्यांना बाहेर काढून उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी पुर्णगड पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.









