रत्नागिरी:- शुक्रवारपासून मासेमारीवरील बंदी उठल्यानंतर पहिल्याच दिवशी स्थानिक खलाशी असलेल्या मच्छिमारांनी मासेमारीचा मुहुर्त साधला. मागील काही दिवस पावसाचा जोर कमी होता. मात्र, एन हंगामाच्या पहिल्याच दिवशी पावसाचा जोर काही प्रमाणात वाढल्याने केवळ २० टक्केच मासेमारी नौकानी समुद्रात उतरण्याचा निर्णय घेतला. पावसाचा जोर तुलनेत कमी असल्याने समुद्र किनार्यावर पाण्याचा करंट कमी आहे. त्यामुळे काहि मच्छिमारांनी किनारी भागात १० वाव परिसरात मासेमारीचा मुहुर्त केला. पहिल्याच दिवशी बांगडा, कोळंबी, सौंदाळा जाळ्यात सापडली होती.
राज्य सरकाने दि. १ जुन ते ३१ जुलै या दोन महिन्यांच्या काळासाठी मासेमारीवर बंदी घातली होती. हा मोसम पावसाळी आणि माशांचा प्रजनन काळ असल्यामुळे मच्छीमारही मासेमारीला जात नाहीत. बंदी कालावधी संपुष्टात आला असून शनिवारी मुहुर्त साधण्याचा काहींनी प्रयत्न केला. ट्रॉलिंग, गिलनेटद्वारे मासेमारीला सुरवात होते.
पर्ससिननेटद्वारे मासेमारीला दि. १ सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. बहुतांश मच्छीमारांची समुद्रात जाण्यासाठी तयारी झालेली नाही. त्यामुळे सर्वात मोठे बंदर म्हणून ओळखल्या जाणार्या रत्नागिरीतील मिरकरवाडा येथे शुकशुकाट होता.
मागील काही दिवसांपासून पावसाने उघडीप दिली होती. मात्र हंगामाच्या दोन दिवस आधी काही प्रमाणात पावसाचा जोर काही प्रमाणात वाढला. यामुळे तयारी झालेली असताना देखील अनेक नौकानी शुक्रवारी मुहूर्त उद्यावर ढकलला आहे. केवळ वीस टक्के नोकानी मासेमारीचा मुहूर्त साधला. यामध्येही ट्रॉलिंग करणार्यांची संख्या अत्यल्प असून गिलनेटद्वारे मासेमारी करणाऱ्यांचा टक्का अधिक आहे. वरवडे येथील काही छोटे मच्छीमार सकाळच्या सत्रात समुद्रात गेले होते. त्यांना कोळंबी, बांगडा, सौंदाळा यासारखी मच्छि मिळाली. परंतु छोटे मच्छमारही खोल समुद्रात जाण्याच्या मानसिकतेमध्ये नाही. बंपर मच्छिसाठी १५ वावाच्या पुढे जावे लागणार आहे. या कालावधीत अचानक वातावरण बिघडले तर धोका निर्माण होऊ शकतो. मच्छि किनाऱ्याकडे सरकण्याची प्रतिक्षा या छोट्या मच्छीमारांना आहे.