मुरुड जंगलमय भागात आढळला मृतदेह

दापोली:- तालुक्यातील मुड येथे जंगलमय भागात ३६ व्या वर्षीय तरुणाचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला. राजू नामदेव पवार असे या तरूणाचे नाव असून हा तरूण विजापूर-कुन्नर येथील रहिवासी असल्याचे स्पष्ट झाले आहे.

दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेबाबत फिर्याद देणाऱ्याने मुरूड सडा येथे तलाव खणण्याचे काम घेतले आहे. त्यांनी भाड्याने घेतलेल्या पोकलेन मशिनवर काम करणारा राजू पवार १२ मार्च रोजी रात्री ९.३०च्या दरम्यान कामावर निघून गेला होता. त्यानंतर तो परत कामावर आला नाही. दरम्यान, २७ मार्च सायंकाळी ६च्या दरम्यान सुरेश चव्हाण यांनी सडा येथील तलावाचे खोदकाम चालू असलेल्या समोरील जंगलमय भागांत उग्र वास येत असल्याचे सांगितले. यामुळे फिर्यादी व पोलीस पाटील समीर बाळ यांनी ग्रामस्थांसह तेथे जावून पाहिले असता तेथे एका झाडाच्या फांदीला दोरीच्या सहाय्याने कुजलेल्या अवस्थेतील एक मृतदेह आढळला. मात्र मृतदेहाच्या कपड्यांवरून व बाजूला पडलेल्या पोकलेनच्या चावीवरून हा मृतदेह राजू नामदेव पवार याचा असल्याचे स्पष्ट झाले. या घटनेची नोंद दापोली पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. अधिक तपास दापोली पोलीस करीत आहेत.