जांभुर्डे येथील घटनेमुळे हळहळ
खेड:- मुंबईहून रत्नागिरीतील खेड येथे वास्तव्यास आलेल्या एका ६९ वर्षीय ज्येष्ठ महिलेचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. गौरी प्रेमजी बोरीचा असे या मृत महिलेचे नाव असून, उपजिल्हा रुग्णालय कळंबणी येथे उपचारापूर्वीच त्यांना मृत घोषित करण्यात आले. या प्रकरणी खेड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मूळच्या कांदिवली पश्चिम (मुंबई) येथील रहिवासी असलेल्या गौरी बोरीचा या सध्या खेड तालुक्यातील जांभुर्डे गवळवाडी येथे राहत होत्या. शनिवारी, ३ जानेवारी रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास त्यांचे नातू आणि या प्रकरणातील खबर देणार प्रतिक प्रवीण वाडकर हे आपल्या आईसह भरणे येथे गेले होते. त्यावेळी आजीच्या केअर टेकरने फोन करून गौरी यांची तब्येत अचानक बिघडल्याची माहिती दिली. माहिती मिळताच प्रतिक वाडकर यांनी तात्काळ जांभुर्डे येथील घरी धाव घेतली. त्यावेळी त्यांची आजी निपचीत पडल्याचे त्यांना दिसून आले.
प्रतिक यांनी विलंब न लावता रुग्णवाहिका बोलावून आजीला उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय कळंबणी येथे नेले. मात्र, रात्री ८:३० वाजण्याच्या सुमारास तेथील डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. वैद्यकीय तपासणीत ‘कोरोनरी धमनी रोग’ म्हणजेच हृदयाच्या रक्तवाहिन्यांशी संबंधित आजारामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी ४ जानेवारी रोजी पहाटे १:२१ वाजता बी.एन.एस.एस. कलम १९४ प्रमाणे एएमआर क्रमांक ०१/२०२६ नुसार घटनेची नोंद केली आहे. या घटनेमुळे जांभुर्डे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.









