मुंबई-गोवा महामार्गावर कार अपघात; पाचजण जखमी

खेड:- मुंबई -गोवा महामार्गावर आपेडे फाटा येथे मारुती ब्रिझा आणि टाटा नॅनो या दोन वाहनांमध्ये समोरासमोर टक्कर होऊन झालेल्या अपघातात पाचजण जखमी झाले आहेत. हा अपघात मंगळवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास झाला. या अपघातात नॅनो गाडीच्या चालकाला गंभीर दुखापत झाली असून, ब्रिझा कारमधील चारजण किरकोळ जखमी झाले आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजेंद्र दत्ताराम शिंदे (५७, रा. मुंबई) हे शिमगोत्सवासाठी, ग्रामदेवतेच्या पालखी दर्शनासाठी मुंबई येथून गुहागरला ब्रिझा कारने (एमएच ४७ एसी ३०७३) जात होते. मुंबई – गोवा महामार्गावर कळंबणी गावानजीक आपेडे फाटा येथे समोरून येणाऱ्या टाटा नॅनो कारशी (एमएच १५ ईपी १४७५) त्यांची समोरासमोर टक्कर झाली.

या अपघातात दोन्ही गाड्यांचे प्रचंड नुकसान झाले, तर टाटा नॅनो कारचा चालक राहुल पवार याला गंभीर दुखापत झाली. त्याला तत्काळ खेडमधील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले. ब्रिझा कारमधील राजेंद्र दत्ताराम शिंदे (५७), निर्मला राजेंद्र शिंदे ( ५३), सायली राजेंद्र शिंदे (१९) आणि ज्योती प्रकाश विचारे (५९) या चौघांना किरकोळ दुखापत झाली. या सर्व जखमींना कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले. अपघाताची खबर मिळताच खेड पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक इनामदार यांनी कर्मचाऱ्यांसहीत घटनास्थळी धाव घेतली. या अपघाताचा अधिक तपास पोलीस करत आहेत.