रत्नागिरी:- लांजा येथे मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर कुंभारवाडा सरगम लॉजसमोर एका अज्ञात वाहनाने धडक दिल्याने एका अनोळखी पादचाऱ्याचा मृत्यू झाला. हा अपघात ६ मे २०२५ रोजी रात्री सुमारे १०.३० वाजता घडला.
लांजा पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल सुयोग रोहिदास वाडकर यांनी याप्रकरणी फिर्याद दाखल केली आहे. फिर्यादीनुसार, अज्ञात वाहन चालकाने त्याचे वाहन निष्काळजीपणे आणि भरधाव वेगात चालवून रस्त्याने चालणाऱ्या अनोळखी व्यक्तीला धडक दिली. या अपघातात पादचारी गंभीर जखमी होऊन त्याचा मृत्यू झाला. अपघात घडल्यानंतर वाहनचालक घटनास्थळावरून कोणताही पत्ता न देता निघून गेला.
याप्रकरणी लांजा पोलिसांनी अज्ञात वाहन चालकाविरुद्ध भारतीय न्याय संहिता अधिनियम २०२३ चे कलम १०६, २८१, १२५(अ), १२५ (ब) आणि मोटार वाहन कायद्याचे कलम १८४, १३४/१७७ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी अज्ञात मृतदेहाची ओळख पटवण्याचे आणि फरार वाहन चालकाचा शोध घेण्याचे काम सुरू केले आहे.