मी भाजप जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिलाय, पक्षाच्या सदस्यत्वाचा नाही: राजेश सावंत

रत्नागिरी:- भारतीय जनता पक्षाचे (भाजप) माजी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी आज पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे आपल्या गुरुस्थानी असल्याचे सांगत, त्यांच्याबद्दल असलेला आदर त्यांनी व्यक्त केला. तसेच, आपण भाजपच्या सदस्य पदाचा राजीनामा दिला नव्हता, जिल्हा अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता असेही त्यांनी स्पष्ट केले.

अलीकडेच सावंत यांनी दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या पार्श्वभूमीवर ही पत्रकार परिषद महत्त्वाची मानली जात आहे. सावंत यांची कन्या शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) कोट्यातून निवडणूक लढवत आहे. या कौटुंबिक आणि राजकीय पेचप्रसंगावर बोलताना सावंत यांनी सांगितले की, आजपासून ते आपल्या मुलीच्या प्रचारासाठी मैदानात उतरणार आहेत.

राजेश सावंत यांनी जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला असला तरी, भाजपच्या सदस्यपदाचा राजीनामा दिला नव्हता, असे त्यांनी स्पष्ट केले. त्यांनी चव्हाण साहेबांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली, त्यांच्या मार्गदर्शनाला महत्त्व दिले, आणि सोबतच मुलीला पाठिंबा देण्यासाठी राजकीय निर्णय घेतला. निवडणुकीच्या तोंडावर वडिलांनी मुलीच्या प्रचारासाठी बाहेर पडण्याचा घेतलेला निर्णय रत्नागिरीच्या राजकारणात सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.