मिऱ्या येथून रस्त्याच्या काँक्रिटीकरणाला सुरवात

रत्नागिरी:- मिऱ्या-नागपूर चौपदरीकरणामधील मिऱ्या येथून रस्त्याच्या काँक्रिटीकरणाला सुरवात झाली आहे. मिऱ्या बंदर येथून पुढे माजी आमदार बाळ माने यांच्या घराच्यापुढे एका बाजूने हे काँक्रिटीकरण सुरू झाले आहे; मात्र झालेल्या काँक्रिटीकरणावर वेळेत पाणी मारले जात नाही, असा स्थानिकांचा आरोप आहे; परंतु याबाबत ठेकेदार कंपनीने तत्काळ दखल घेऊन काँक्रिटीकरणावर पाणी मारण्याचे आश्वासन दिले.

मिऱ्या-नागपूर महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम वेगाने सुरू झाले आहे. मिऱ्या ते आंबाघाटापर्यंत रत्नागिरी प्रांताधिकाऱ्यांकडे भूसंपादनाचे काम होते. ते पूर्ण झाल्यामुळे या मार्गाच्या कामाला जोरदार सुरवात झाली. मुंबई-गोवा महामार्गाच्या तुलनेत जास्तच वेगाने हे काम सुरू आहे. आंबाघाटापासून पालीपर्यंत चौपदरीकरणाचे सपाटीकरण होत आले आहे. काही ठिकाणी काँक्रिटीकरणाची एक लाईन टप्प्याटप्प्याने टाकण्यात आली आहे. त्यामुळे मार्ग लवकर पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. मिऱ्या बंदरपासून या मार्गाच्या दुपदरीकरणाला सुरवात झाली.
काँक्रिटची एक लाईन टाकण्यात आली आहे. काम पूर्ण झालेल्या काँक्रिटवर पाणी राहावे यासाठी गोणपाटे टाकून त्यावर पाणी मारले जात आहे. गोणपाटे ओली राहात असल्याने काँक्रिटला त्याचा फायदा होतो; परंतु काही भागात गोणपाटे सुकली आहेत. काही दिवस पाणी मारलेच नाही, असा आरोप स्थानिकांनी केला आहे. याबाबत ठेकेदार कंपनीला कल्पना दिल्यानंतर कंपनीने पाणी मारण्याचे आश्वासन दिले.