पत्तन विभागाची कारवाई ; सुधारणा न झाल्यास काळ्या यादीत टाकण्याचा इशारा
रत्नागिरी:- मिऱ्या धूपप्रतिबंधक बंधाऱ्याचे काम घेणाऱ्या ठेकेदाराला पत्तन विभागाने दुसरा दणका दिला आहे. मरिन ड्राईव्हच्या धर्तीवर बांधण्यात येणाऱ्या या बंधाऱ्याचे वर्षभरात अपेक्षित काम न झाल्याने १८ लाख ८० हजाराचा दंड करण्यात आला आहे. नुकताच हा प्रस्ताव पत्तन विभागाच्या मुख्य कार्यालयाने मंजूर केल्याचे पत्तन विभागाने सांगितले. त्यानंतर ठेकेदाराला दिलेल्या मुदतीत काम सुरू न केल्याने दुसऱ्यांदा १८ लाखाचा दंड केला आहे. पत्तन विभागाने आतापर्यंत ३७ लाखाचा दंड ठेकेदाराला केला आहे. त्यानंतरही सुधारणा न झाल्यास काळ्या यादीत टाकण्याची कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.
सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अंतर्गत येणारा पत्तन विभाग यावर लक्ष ठेवून आहे. कामासाठी दोन वर्षाची मुदत देण्यात आली आहे. हे काम वेळेत आणि दर्जेदार व्हावे यासाठी पत्तन विभाग या कामावर लक्ष ठेवून आहे. तरी या कामला अपेक्षित गती मिळालेली नाही. मिऱ्या गावाच्या सुरक्षेच्यादृष्टीने सुमारे साडेतीन किमीच्या पक्क्या धूपप्रतिबंधक बंधाऱ्याची मागणी अनेक वर्षांपासून होती. मिऱ्यावासियांनी याबाबत आंदोलन केल्यानंतर शासनाने हा बंधारा मंजूर केला. सुमारे १६० कोटी रुपयांचा हा धूपप्रतिबंधक बंधारा आहे. साडेतीन किलोमीटर लांबीचा हा बंधारा २ वर्षात पूर्ण करायचा अवधी आहे; मात्र १० महिन्याच्या कालावधीच्या अनुषंगाने अपेक्षित काम संबंधित ठेकेदाराने केलेले नाही. बंधाऱ्याचा अजून एकही दगड लावला गेला नाही. रत्नागिरीचे पत्तन अभियंत्यांनी याबद्दल संबंधित ठेकेदारावर १८ लाख ८० हजार रुपयांचा दंडात्मक कारवाईचा प्रस्ताव किनारा अभियंत्यांकडे पाठवण्यात आला होता. हा प्रस्ताव मंजूर झाल्याने ठेकेदारावर १८ लाख ८० हजाराची दंडात्मक कारवाई करण्यात आली; परंतु ठेकेदाराकडून विलंब होताना दिसत आहे. कारवाईमुळे या कामाला गती मिळण्याची शक्यता होती. पुन्हा दिलेल्या मुदतीत ठेकेदाराने काम सुरू न केल्याने ठेकेदारावर दुसऱ्यांदा १८ लाख रुपये दंडाची कारवाई करण्यात आल्याची माहिती पत्तन विभागाने दिली. दोन्ही कारवाईमध्ये ठेकेदाराला ३७ लाखाचा दंड झाला आहे. यानंतरही सुधारणा न झाल्यास काळ्या यादीत टाकण्याचा कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.