रत्नागिरी:- मिर्या धूपप्रतिबंधक बंधारा बांधण्याच्या कामात जागा मोजणीचा अडथळा निर्माण झाला आहे. अति तातडीने जागा मोजणीची 33 लाख रुपयांची रक्कम भूमी अभिलेख विभागाकडे कोणी भरायची या संदर्भात पत्तन (हार्बर) विभाग आणि रत्नागिरी नगर परिषदेमध्ये तू तू मै मै सुरू आहे. त्यामुळे बंधारा मोजणी फी च्या लाटेत मागे लोटला जाण्याची भीती आहे.
पालकमंत्री उदय सामंत यांनी विकास कामांची नुकतीच आढावा बैठक घेतली. यावेळी पत्तनचे कार्यकारी अभियंता भाऊसाहेब हजारे यांनी ही बाब पालकमंत्र्यांना सांगितली नाही. केवळ बंधार्याचे काम किती झाले आहे एवढीच माहिती दिली.
मुरुगवाडा, पांढरा समुद्र ते मिर्या बंदरपर्यंत एकूण 3 हजार 400 मिटरच्या टेट्रापॉड्स व ग्रायनचा धूपप्रतिबंधक बंधारा बांधला जात आहे.
गेल्या सप्टेंबर महिन्यापासून बंधार्याचे काम सुरू झाले असून सुमारे 1 हजार 700 मिटरचा बंधारा झाला असल्याचे पत्तन कार्यकारी अभियंता हजारे यांनी पालकमंत्री उदय सामंत यांनी घेतलेल्या आढावा बैठकीत सांगितले. परंतु या प्रकरणात जागेचा वाद सुरू असल्याबाबत कोणतीही माहिती पालकमंत्र्यांना दिलेली नाही. यासंदर्भात एका अभियंत्याशी संपर्क साधला असता त्यांनी याबाबतची पालकमंत्र्यांना कल्पना असल्याचे सांगितले.
मिर्या धूपप्रतिबंधक बंधारा ज्या ठिकाणी बांधला जात आहे तेथून नगर परिषदेचा मंजूर विकास आराखड्यातील रस्ता आहे. या रस्त्यातील काही भाग समुद्राच्या लाटांनी पोखरला गेला आहे. त्याठिकाणीही बंधार्याचे काम होत असल्याची माहिती मिळताच नगर परिषदेच्या अधिकार्यांनी प्रत्यक्ष भेट देवून पाहणी केली. त्यानंतर प्रत्यक्ष सीमांकन करून दिल्यानंतर नगर परिषदेने त्यानुसार काम करण्याचे पत्तन विभागाला कळवले. यावर पत्तन विभागाने अंदाजपत्रकानुसारच बंधारा बांधला जात असल्याचे सांगितले. हा वाद वाढत गेला आणि जागा मोजून घेण्यावर एकमत झाले.
रत्नागिरी नगर परिषदेने शासनाच्या मंजूर विकास योजनेंतर्गत असलेल्या बंधार्याजवळच्या रस्त्याच्या जागेची मोजणी करून घेण्यास पतन विभागाला कळवले. पतन विभागाने भूमिअभिलेखकडून शासकीय मोजणी करण्याचा आग्रह धरला. इतकेच नव्हे तर जागा मोजणीसाठी येणारी फी भरण्याची तयारीसुद्धा दर्शवली. त्यानुसार रनपने अतितातडीच्या मोजणीसाठीचा प्रस्ताव दिल्यानंतर त्याबाबतची 33 लाख रुपयांची फी भरण्यास भूमिअभिलेखकडून कळवण्यात आले. तर ‘रनप’ने 33 लाख रुपये फी भरण्याबाबत पतन विभागाला कळवले. त्यानंतर आता ही फी कोणी भरायची यावर अडलं आहे.









