रत्नागिरी:- रत्नागिरीतील मिरकरवाडा बंदरावरील अनधिकृत झोपड्या, शेड, बांधकामे हटविण्याच्या कारवाईला विरोध करणार्या जिल्हास्तरीय मच्छीमार नेत्यांची एकही झोपडी किंवा शेड नाही. या कारवाई संदर्भात पालकमंत्री उदय सामंत यांच्यासोबत याच मच्छीमार नेत्यांची बैठक झाली. यामध्ये बंदरावरील जेटींपासून 15 फुटांपर्यंत असलेल्या झोपड्या, शेड, बांधकामे हटविण्याबाबत एकमत झाले.
रत्नागिरीतील मिरकरवाडा बंदरावर मत्स्यव्यवसाय विभागाच्या मालकीच्या जागेत अतिक्रमण झाले आहे. यातील बहुसंख्य अतिक्रमण जिल्ह्याच्याच नव्हे तर राज्या बाहेरील लोकांकडून झाले आहे. या परप्रांतियांना काही मच्छीमार नेत्यांनीच अतिक्रमण करण्यास हातभार लावला. त्या नंतर तेथे अवैध धंद्यांचे पीक आले. पोलिसांनी नुकत्याच अमली पदार्थ विरोधी कारवाया केल्या आहेत. हे अतिक्रमण हटविण्यासाठी मत्स्यव्यवसाय विभागाने गेल्या मार्च महिन्यात नोटीस बजावून 16 ऑक्टोबर पर्यंत अतिक्रमण हटविण्यास सांगितले. परंतू त्या नोटीसची दखलच न घेतली गेल्याने दि. 17 ऑक्टोबरच्या सकाळी अतिक्रमण हटविण्याची मोहिम सुरु झाली.
अनुचित प्रकार रोखण्यासाठी पोलिस बंदोबस्तात ही कारवाई होत होती. परंतू या कारवाईचे नियोजन नसल्याने कुठून अतिक्रमण हटविण्याची कारवाई सुरु करायची, याची माहिती नव्हती. त्यामुळे थोडाफार विरोध होऊ लागल्याने कारवाईला विलंब होत होता. त्यातच जिल्हास्तरीय मच्छीमार नेत्यांनी शिवसेनेच्या पदांचा राजीनामा देण्याची घाई केली. परिणामी मंगळवारनंतर ही कारवाई स्थगित झाली.
गेल्या 7 वर्षांपासून डिसेंबर नंतरच्या मासेमारीच्या काळात ज्या पालकमंत्री उदय सामंत यांनी पावलो पावली मदत केली, त्यांनाच राजीनाम्यांची भीती दाखवून कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे या नेत्यांची प्रतिमा’काम खतम आदमी खतम’अशी झाली आहे.
मिरकरवाडा बंदरावरील कारवाई संदर्भात पालकमंत्र्यांनी सर्किटहाऊस येथे बैठक घेतली. या बैठकीला जिल्हास्तरीय नेते उपस्थित होते.
या नौका मालकांची एकही झोपडी अथवा शेड बंदरावर नाही. अनधिकृत झोपडी, शेड बांधणारे बाहेर उभे होते. त्यातील एकालाही या बैठकीला बोलावण्यात आले नाही, याबाबत मच्छीमार नेत्यांप्रती नाराजीही व्यक्त होत होती. दरम्यान, या बैठकीत मच्छीमार नौकांच्या बाबतीत समस्या मांडण्यात आल्या. त्याचवेळी बंदरावर जेट्या असून तेथून 15 फुटापर्यंतचे अतिक्रमण हटविण्याबाबत मच्छीमारांनी सहमती दर्शवली. पालकमंत्र्यांकडून हिताची कामे होत असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्याच नेत्यांनी आम्ही मरेपर्यंत ना. उदय सामंत यांच्यासोबत राहणार, असे जाहीर केले.









