मिरकरवाडा बंदरातील पर्ससीन नौकांमुळे अन्य नौकांना अडथळा

रत्नागिरी:-  पावसाळी मासेमारी बंदी 31 मे पासून सुरु होत आहे. यंदाचा मासेमारी हंगाम फायद्यात गेलेल्या 21 नौका मालकांनी त्यांच्या पर्ससीननेट नौका मिरकरवाडा बंदरातील जेटींवर शाकारून ठेवल्या आहेत. नुकसान भरून येईल या आशेवर मासेमारी करून बंदरात येणार्‍या नौकांना जेटीवर येण्यासाठी शाकारून ठेवलेल्या नौकांचा अडथळा होत आहे. समुद्रात मासेमारी करून ज्या नौकांना जेटीवर येण्यासाठी आणि मासळी उतरवून घेताना अडथळा येत आहे त्यांनी सहाय्यक मत्स्यव्यवसाय आयुक्त कार्यालयाकडे तक्रारी केल्या. त्यानुसार शाकारून ठेवलेल्या नौका तेथून काढण्यासाठी मिरकरवाडा बंदर प्राधिकरणाकडून नोटीस बजावण्यात आल्या आहेत.

पावसाळी मासेमारी बंदी 31 मे पासून सुरु होत आहे. या पार्श्वभूमीवर पर्ससीननेट नौका बंदरातील जेटींवर शाकारून ठेवण्यासाठी 10 मे पासूनच सुरुवात होते. परंतू यावर्षी 21 नौका जेटींवर अशा पद्धतीने पूर्णपणे बंदिस्त करून शाकारून ठेवल्या आहेत की ज्यामुळे इतर नौकांना जेटीवर येवून मासळी उतरवणे फारच जिकरीचे बनले आहे. त्यामुळे पर्ससीननेट मच्छीमार रत्नागिरी तालुका असोसिएशनने सहाय्यक मत्स्यव्यवसाय आयुक्तांकडे तक्रार करून इतर नौकांना जेटी मोकळी करून देण्याबाबत कार्यवाही करण्यासाठी निवेदन दिले.

सहाय्यक मत्स्यव्यवसाय आयुक्त कार्यालयाकडून मिरकरवाडा बंदराचे नियंत्रण करणार्‍या मिरकरवाडा प्राधिकरणाच्या मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी अक्षया मयेकर यांना कार्यवाही करण्याच्या सूचना करण्यात आली. त्यानुसार शाकारून ठेवण्यात आलेल्या नौका मालकांना जेटीवरील नौका हलवून भगवती बंदरात उभ्या करण्यास सूचवण्यात आले. नोटीस देवूनही कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने पर्ससीननेट रत्नागिरी तालुका मालक असो. चे अध्यक्ष विकास उर्फ धाडस सावंत, सेक्रेटरी जावेद होडेकर, किशोर नार्वेकर, विरेंद्र नार्वेकर व इतर पदाधिकार्‍यांनी मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी आनंद पालव यांची भेट घेतली. नोटीस देवूनही शाकारून ठेवलेल्या नौका जेटीवरून न हलवणार्‍या नौका मालकांवर फौजदारी कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.

जिल्ह्यात सुमारे 275 पर्ससीननेट नौका आहेत. बहुसंख्य नौका मिरकवाडा बंदरातील आहेत. त्यामुळे ज्यांचा यंदाचा मासेमारी हंगाम चांगला गेला आहे त्यांनी 10 मे पासूनच आपल्या नौका शाकारून ठेवण्यास सुरुवात केली आहे. पावसाळी मासेमारीला बंदी सुरु होण्यास अजून 20 दिवस असतानाही नौका शाकारून ठेवून जेटी अडवण्यात आली आहे.ती मोकळी करुन देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.