मिरकरवाडा खडक मोहल्ला येथील शौचालयाची दुरवस्था; रनप प्रशासनाचे पूर्णतः दुर्लक्ष

रत्नागिरी:- शहरातील मिरकरवाडा खडक मोहल्ला येथील सौचालयाची पूर्णतः दुरवस्था झाली आहे.दोन महिन्यांपासून हे सौचालय देखभाली अभावी बंद आहे. सौचालयात पाणी नाही. पाण्याची टाकी देखील दोन महिन्यांपूर्वी वाऱ्याने उडून गेली असून याकडे लक्ष देण्यास रनप प्रशासन टाळाटाळ करत असल्याचा आरोप येथील स्थानिक नागरिकांनी केला आहे.

स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शहरात प्रत्येक ठिकाणी सौचालय उभारणी करण्यात आली. मात्र सद्यस्थितीत या सौचालयांच्या देखभाल दुरुस्तीकडे पूर्णतः दुर्लक्ष होत असल्याचे समोर येत आहे. शहरातील मिरकरवाडा येथील खडक मोहल्ला येथील सौचालयाची पूर्णतः दुरवस्था झाली आहे. दोन महिन्यांपासून हे सौचालय बंद आहे. या ठिकाणी असलेली पाण्याची टाकी वाऱ्याने उडून गेली आहे. तसेच पाण्याचा पुरवठा देखील बंद आहे. सौचालयात सद्यस्थितीत कचऱ्याचे साम्राज्य आहे. नगर परिषद प्रशासनाकडे याबाबत वेळोवेळी तक्रार देखील करण्यात आली. मात्र, प्रशासनाने याकडे पूर्णतः दुर्लक्षच केले आहे. या ठिकाणी मिरकरवाडा बंदर असल्याने खलाशांचा मोठा वावर असतो. अशावेळी बंद असलेल्या सौचालयामुळे प्रचंड गैरसोय निर्माण होत असून याकडे नगर परिषद प्रशासनाने तत्काळ लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे.